देवेंद्र फडणवीसांचा इशारा; 'पुढचं सरकार भाजपचंच'

देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका

मुंबई : राज्यात १५ दिवसानंतरही सत्तास्थापनेचा पेच न सुटल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारला आहे, पण राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून थोडे दिवस राहावं, असं सांगितलं. त्यामुळे फडणवीस या पदावर कायम राहणार आहेत.

राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी पुढचं सरकार भाजपचंच असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं कधीही ठरलं नव्हतं, तसंच एकदा या फॉर्म्युलामुळे बोलणी फिस्कटली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझे फोन उचचले नाहीत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरही टीका केली. मागच्या काही दिवसांमध्ये आणि मागच्या ५ वर्षांमध्ये शिवसेना नेत्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहूनही सर्वोच्च नेत्यावर टीका करणं चुकीचं आहे. अशाप्रकारची टीका विरोधकांनीही केली नसल्याचं फडणवीस म्हणाले. तुमच्या टीकेला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, पण आम्ही तशी टीका करणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

निवडणूक निकालाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे सगळे पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरे बोलल्यामुळे धक्का बसल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्यांच्याविरुद्ध निवडणूक लढले त्यांच्याशीच चर्चा करायची पण आमच्याशी चर्चा करायला वेळ नाही, आमचे फोनही उचलले जात नाहीत, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एवढा जनादेश मिळाल्यानंतरही जनतेला सरकार देऊ शकलो नाही, याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली.



संबंधित पोस्ट