भाजप सरकारमुळे देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात : सुभाष पिसाळ

राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेलची जिल्हा आढावा बैठक संपन्न .

बदलापुर(प्रतिनिधी) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आले असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी केली. भाजप जर स्वतःला निधर्मी म्हणवत आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदी अन्य धर्मीय, ओबीसी किंवा मागासवर्गीय व्यक्तीची निवड कराल का असा सवालही पिसाळ यांनी यावेळी उपस्थित केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेलची ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक गुरुवारी येथील यशस्विनी भवन सभागृहात पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन यावेळी करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी वरील टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेलचे प्रदेश सरचिटणीस आणि कोकण प्रभारी राज राजापूरकर, चिटणीस हेमंत रुमणे, जिल्हा महिला उपाध्यक्षा अनिता पाटील, शहर महिला अध्यक्षा अनघा वारंग, ओ बी सी जिल्हा सरचिटणीस.  ॲड . अनिल पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आयोजक जिल्हाध्यक्ष संजय कराळे यांनी स्वागत करुन , हेमंत रुमणे यांनी प्रास्तविक केले  तर संपदा सावंत यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. 

गेल्यावर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात म्हणाले होते कि राज्यात विरोधी पक्ष रहाणार नाही मात्र शरद पवार यांनी त्यांचे कसब पणाला लावले आणि अलौकिक चमत्कार घडविला. एकशे पाच आमदार असलेल्या भाजपाला विरोधी बाकावर बसवून देवेंद्र फडणवीस यांनाच विरोधी पक्ष नेतेपदावर समाधान मानावे लागले असे प्रतिपादन सुभाष पिसाळ यांनी आपल्या भाषणात केले. शरद पवार साहेबानी भाजपाला राज्याच्या सत्तेतून हद्दपार करीत राज्यात सत्ता आणली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी झाली आहे. त्यामुळे आता पक्ष कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येऊ घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता यावी यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहनही सुभाष पिसाळ यांनी केले. ओ बी सी सेलचे कोकण प्रभारी आणि प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी झंझावाती दौरे काढून संपूर्ण कोकण विभाग ढवळून काढला असल्याचे  सुभाष पिसाळ यांनी म्हटले आहे .  मागील पाच वर्षाच्या भाजप युतीच्या काळात महाराष्ट्र वीस वर्षे मागे गेला आहे, महाराष्ट्राचे गतवैभव प्राप्त करून देण्याची आवश्यकता असून ती जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची असल्याचेही सुभाष पिसाळ यांनी यावेळी सांगितले. 

कोरोनाच्या या महामारीत सर्वसाधारण नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या वाढलेल्या आहेत. या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेत मिळून मिसळून कार्य करून आपली कर्तव्यतत्परता दाखवून द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेलचे प्रदेश सरचिटणीस आणि कोकण प्रभारी राज राजापूरकर यांनी आपल्या मनोगतात केले. हेमंत रुमणे, संजय कराळे आदी पदाधिकाऱ्यांचीही समयोचित भाषणे झाली.

संबंधित पोस्ट