शिवसेनेला वैचारिक भूमिका ठरवावी लागेल...!

 सत्तेसाठी विचारांना आणि अस्मितेला तिलांजली देणाऱ्या सोयीप्रमाणे भूमिका बदलणाऱ्या दुतोंडी राजकारण्यांची महाराष्ट्रात आणि देशात कधीच वानवा नव्हती. प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झाल्यास हे सगळे लवंडे राजकारणी आहेत..बूड नसलेले सगळे लोटे आहेत..असे बिनबुडाचे लोटे आपलेच वारसदार निघतील याची कल्पनाही प्रबोधनकारांनी कधी केली नसेल..प्रबोधनकारांच्या वक्तृत्वाची नक्कल करण्यात त्यांच्या वारसदारांनी धन्यता मानली पण त्यांचे प्रखर आणि निर्भीड विचारांना मात्र सोयीस्करपणे बाजूला सारले.. बाळासाहेब ठाकरें प्रबोधनकारांचे प्रखर विचार पुढे नेतील अशी महाराष्ट्राला आशा होती परंतु ८० टक्के समाजकारण करण्यासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेचं १०० टक्के राजकारणात कधी परावर्तित झाले हेच समजले नाही.

 शिवसेनेत बाळासाहेब म्हणतील ती पूर्व दिशा असे मानले जात होते, वैचारिक देवाणघेवाण, प्रबोधनाला बाळासाहेबांच्या शिवसेनेत स्थान नव्हते.. शिवसेनेत जातीभेद पाळला जात नाही असे मानले तरी प्रबोधनकारांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या शिवसेनेची वैचारिक पातळी बाळासाहेबांनी हिंदुत्वा पुरती संकुचित ठेवली हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावे लागेल. प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला छत्रपतींसोबत शाहू,फुले,आंबडेकर यांच्या विचारधारेची दिशा दाखवली. मात्र बाळासाहेबांनी मात्र छत्रपतींना एका विशिष्ट धर्माच्या विचारसरणीत जोखडून सावरकरनीती जोपासली. आणि या सावरकरनीतीमुळेच महाराष्ट्रात द्वेषाचं राजकारण फोफावल गेलं. बाळासाहेबांनी प्रबोधनकारांची शैली आणि निर्भीड बाणा जसाच्या तसा आत्मसात केला पण विचारांपासून मात्र फारकत घेतली, कदाचित प्रबोधनकारांचे परखड विचार बाळासाहेबांना राजकीय सोयीचे वाटत नसावे..!  समाजकारणाची काढलेली टूम त्यांनी राजकारणात प्रस्थापित होऊन विसर्जित केली. बाळासाहेब पक्के राजकारणी होते. त्यांनीही कायम सोयीचे राजकारण केले. काँग्रेसने कम्युनिस्टांना संपविण्यासाठी शिवसेनेचा वापर केला आणि काँग्रेसच्या आशीर्वादाने शिवसेनेने आपली पाळेमुळे घट्ट केली. शिवसेना जर खरीच मराठी माणसाच्या कल्याणासाठी स्थापन झाली असती तर ९९ टक्के मराठी असलेला गिरणी कामगार देशोधडीला लागला असता का?  कदाचित या प्रश्नाकडे बाळासाहेबांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल कारण तेव्हा त्यांना वसंतसेना बनून सोयीचे राजकारण करण्यातच धन्यता वाटली असावी.
संविधानाची चौकट मोडण्याचा सर्वप्रथम प्रयत्न झाला तो इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीमुळे..! पण बाळासाहेबांना याचे कसलेही सोयरसुतक नव्हतं, ना ही त्यांच्यातला देशाभिमानी दिसून आला. सगळा देश आणीबाणीला विरोध करत असताना बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा देत सपशेल शरणागती पत्करली..याला त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी म्हणा कि कातडी बचाव धोरण..! आज त्याच धोरणाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे..बाळासाहेबांचे वारसदार म्हणवून घेणारे राज ठाकरेही त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवूनच राजकारण करताना दिसत आहेत.
 शिवसेनेपासून फारकत घेऊन राज ठाकरे यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला. बाळासाहेबांची छबी म्हणून वावरणाऱ्या राज ठाकरेंकडे महाराष्ट्रातील जनता एक आश्वासक नेता म्हणून पाहत होती. मराठी माणसांचे, भूमिपुत्रांचे हक्क,अधिकार या मुद्यांना प्रधान्य देत बाळासाहेबांचाच कित्ता पुन्हा राजने गिरवला. मराठी माणसाच्या, भूमिपुत्रांच्या समस्यां ६० वर्षांनंतरही तशाच प्रलंबित असल्या कारणाने जनतेचा प्रतिसादही मिळाला. महाराष्ट्राच्या विकासार्थ सर्व जाती,धर्म,पंथ आणि वर्गाच्या मराठी माणसांना एकत्र करून राज महाराष्ट्र नवनिर्माण करतील असा आशावाद निर्माण झाला होता परंतु सततच्या बदलत्या आणि सोयीस्कर राजकीय भूमिकांमुळे राज ठाकरेंनीही पूर्णपणे भ्रमनिरास केला.   भोंग्याच तुणतुणं वाजवीत तोडफोड आंदोलनं करून माया गोळा करणारे नेते अशी त्यांची प्रतिमा आज जनमानसात आहे.
बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेची सूत्रे हातात आली. बाळासाहेबांसारखी आक्रमक शैली नसतानाही उद्धव यांनी शिवसेनेला उभारी देण्याचा चांगला प्रयत्न केला. उद्धव यांच्या मृदुभाषी आणि सुस्वभावी व्यक्तिमत्वामुळे शिवसेनेच्या एकूणच प्रकृतीमध्ये नरमाई दिसून यायला लागली. भाजपने उद्धव ठाकरेंच्या याच स्वभावाचा फायदा घेत चाणक्यनीतीचा वापर करत शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सुरु केला.. उद्धव यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग करून भाजपाला उताणे पाडले. मात्र भाजपने शिवसेनेतील लवंडे नेत्यांचा गट फोडून शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात आणले. आज उद्धव यांनी झालेल्या गद्दारीतून योग्य धडा घेणे आवश्यक आहे, बाळासाहेबांनी चढविलेल्या हिंदुत्वाची झूल झुगारून पुरोगामित्वाचे ध्येय स्वीकारले पाहिजे. सावरकरवादी आणि कट्टर हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेची अधिकृत भूमिका कधीच नव्हती, बाळासाहेबांनी ती जाणीवपूर्वक तयार केली होती. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका करताना माफीवीर पुराणाची उजळणी केली असली तरी शिवसेनेच्या तथाकथित वैचारिक भूमिकेची कोंडी होण्याचे काहीच कारण नाही. राहुल गांधींची भूमिका आम्हाला मान्य नसून त्यांची अशीच वक्तव्ये कायम राहिली तर महाविकास आघाडीला तडा जाऊ शकतो अशी सूचनावजा इशारा देण्याचीही काही आवश्यकता नाही. संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीमुळेही शिवसेनेला खऱ्या इतिहासाची  उजळणी होणार आहे, त्यासाठी शिवसेनेने तयार राहावं.
आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना विशिष्ट संक्रमणाच्या अवस्थेतून जात असून अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या सावरकरनीतीला तिलांजली देत प्रबोधनकारांच्या फुले शाहू आंबेडकरनीती जोपासण्याची आवश्यकता आहे. सध्या देशात आणीबाणी सदृश परिस्थिती असून लोकशाहीची स्तंभ कमकुवत करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य पद्धतीने सरकार उलथविलं गेलं. ईडी, सीबीआय सारख्या तपासयंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांचे दमन केलं जात आहे. विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करून हा देश हुकूमशाहीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावेळी वैचारिक ठोस भूमिका घेऊन संघर्ष करणाऱ्या राजकीय नेत्यांची नितांत गरज आहे. आणि ही क्षमता प्रबोधनकारांचा वारसा असण्याऱ्या उद्धव ठाकरे यांच्यात नक्कीच असेल. आज शिवसेनेला पुन्हा यशस्वीपणे उभे राहायचं असेल तर माफिवीरांना आदर्श न मानता फुले शाहू आंबेडकरांना, प्रबोधनकारांना आदर्श मानावे लागेल.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट