कोळसेवाडी पोलीस स्टेशनला "ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले पोलीस चौकी" असे नाव द्यावे.भिमपँथर मा.राजेश गवळी यांची जाहीर मागणी.

मुंबई(प्रतिनिधी) कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वेतील  कोळसेवाडी पोलीस स्टेशनचा एक जबरदस्त नावलौकिक असून , गुन्हेगारी क्षेत्रातील बदमाशांना ह्या पोलीस स्टेशनचा मोठा धाक असल्याने ह्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हेगारी प्रकरणांना मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आहे.त्यामुळे कोळसेवाडी पोलीस स्टेशन हे निश्चितच एक आदर्शवत पोलीस स्टेशन म्हणून महाराष्ट्र राज्यात गणल्या जाते.कोरोनाच्या लॉकडाऊन  काळात कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी जे  मानवतावादी कार्य केले त्याला तोड नाही.अर्थात फक्त कोरोना काळातच नव्हे तर नैसर्गिक असो की मानवनिर्मित , कोणत्याही संकटकाळात कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे कर्तबगार पोलीस कर्मचारी आपल्या छातीचा कोट करून आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन सतत कर्तव्यदक्ष असतात निश्चितच ह्या कामी  कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.शाहूराजे साळवे तसेच त्यांचा  सर्व कर्मचारी वर्ग हा अभिनंदनास पात्र आहे.अश्या ह्या आदर्शवत कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे नाव बदलून त्यास विद्येची खरी देवता असणाऱ्या "ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले पोलीस चौकी" असे नाव देण्यात यावे , अशी जाहीर मागणी भिम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केली आहे.

लवकरच ह्या संदर्भात भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा क्षेत्राचे महासचिव मा.रविंद्र साळवे कल्याण शहराचे संघटक सचिव अण्णासाहेब कांबळे , ठाणे जिल्हा संघटक मा.समीर मर्चंडे आणि जितेंद्र भोसले यांच्यासह भीम आर्मीचे एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय गृहमंत्री मा.अनिलजी देशमुख , ठाणे जिल्हा पोलिस आयुक्त मा.विवेकजी फणसाळकर , कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.शाहूराजे साळवे यांस समक्ष भेटून निवेदन सादर करणार आहे.

तसेच ह्या संदर्भात महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक , आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक , शिक्षण क्षेत्रातील महान तपस्वी व्यक्तिमत्त्व मा.देवचंद अंबादे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच  स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे , त्यात भिम आर्मी आपले सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना सांगितले आहे.

संबंधित पोस्ट