शिवसेनेचा पूर्व इतिहास

पालिका सदस्यांना सुरुवातीच्या काळात 'नगरपिता' असे संबोधले जात होते. परंतु बाळासाहेबांनी तेव्हाच्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत आपले उमेदवार मतदारांचे बाप नाहीत म्हणून जे निवडून येतील त्याना जनतेचे सेवक म्हणून 'नगरसेवक' म्हटले जाईल; अशी घोषणा बाळासाहेबांनी केली आणि आज तेच सार्वत्रिक संबोधन होऊन बसले आहे. तेव्हाच्या पालिका निवडणूक निकालानंतर गिरणगाव आणि मुंबईच्या बहुतांश मराठी लोकसंख्येचा विभागात शिवसेनेचे अनेक नगरसेवक निवडून आले तर काहींना दोन नंबरची मते मिळाली त्यामुळे मुंबईतील हा विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला बनून गेला. तिथे अन्य पक्षांना किंवा बिगरकॉग्रेस पक्षांना स्थानच राहिले नाही त्यामुळे मुंबईची राजकीय विभागणी कॉग्रेस आणि शिवसेना अशी होऊन गेली. त्याची प्रचिती विविध क्षेत्रातही येऊ लागली. 

महापालिका निवडणूक लढवल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा कामगार क्षेत्राकडे वळवला व त्यादृष्टीने बांधणी करत आपली वेगळी कामगार संघटना स्थापन केली. भारतीय कामगार सेना असे त्याचे नामकरण केले. नंतर अनेक कंपन्या व उद्योगात भारतीय कामगार सेनेचा शिरकाव होत गेला व मराठी माणसांच्या हाताला रोजदार मिळायला लागला. बहुतेक मोठ्या मोठ्या उद्योगात शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचा झेंडा फडकताना दिसू लागला. त्यानंतर एक एक करीत विविध क्षेत्रात शिवसेना आपला वेगळा झेंडा रोवून उभी रहात गेली. 

अन्यायाच्या विरूद्ध लढत असताना कराव्या लागणाऱ्या हाणामारीत तर शिवसेनेला व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तेव्हा सर्वच जण भियायचे त्यामुळे जनतेत शिवसेनेची चांगलीच ओळख निर्माण झाली होती परिणामी अन्याय होणारा प्रत्येक व्यक्ती पोलिस स्टेशनला जायच्या ऐवजी शिवसेना शाखेत जावून न्याय मिळवायचा. सामाजिक कामात शिवसेनेशी स्पर्धा करणे त्यामुळे अन्य पक्षांना शक्य राहिले नाही. कारण वयात येणारा मराठी तरूण आपोआपच सेनेकडे जाऊ लागला. उलट अन्य बिगर कॉंग्रेसी पक्षांकडे तरूणाला आकर्षित करू शकेल, असा कुठलाही कार्यक्रम शिल्लक नव्हता. शिवसेनेला शिव्याशाप देणे, तिची हेटाळणी करणे वा नावे ठेवणे; यापेक्षा कुठलाही तरूणांना एकत्रित करू शकेल असा विचार वा कार्यक्रम अन्य पक्षांनी घेतलाच नाही. मग अशा डिवचण्यातून हाणामारीचे प्रसंग येऊ लागले. त्या क्षेत्रात सेनेशी टक्कर देऊ शकेल अशी कुठलीही शक्ती या पक्षांकडे नव्हती. नुसत्या डिवचण्याने वा शिव्या मोजून सेना संपण्याची स्वप्ने बघणे, हा निव्वळ मुर्खपणा होता. शिवाय सेनेकडे तरूणांची झुंड असली तरी नेतृत्व किरकोळ होते. ज्यांना भाषणे ठोकता येतील किंवा सविस्तर भूमिका मांडता येतील, असा सुजाणपणा असलेली संख्या बाळासाहेबां व्यतिरिक्त फारच थोडी होती. पण त्यामुळेच उमेदवारी मागणारे वा सत्तेसाठी साठमारी करू शकणार्‍यांची संख्याही कमी होती. तरूणांच्या अंगातील मस्तीला वाट करून देणारे कार्यक्रम वा व्यवस्था, असे सेनेचे स्वरूप त्यावेळेपासून होते. 

निवडणूका संपल्यावर कुठे शहाळी विकावी, घाऊक बाजारात खरेदी केलेल्या वस्तु आपल्या परिसरात स्वस्तामध्ये उपलब्ध करून द्याव्यात, असे स्थानिक पातळीवरचे कार्यक्रम प्रत्येक शिवसेना शाखा तेव्हा करू लागल्या. त्यातूनच वडापावचा जन्म झाला. त्या पहिल्या निवडणूकीत भायखळा पूर्वेचे पराभूत सेना उमेदवार चंद्रकांत आळेकर यांनी मग रेल्वे स्थानकापाशी एक बटाटेवडा विकण्याची गाडी सुरू केली. त्यावर एक फ़लक लावला, ‘शिवसेना पुरस्कृत बटाटेवडा!’ पालिका कर्मचार्‍यांनी त्रास देऊ नये म्हणून हा फ़लक कामी यायचा. कारण सेनेचा धाक तयार झाला होता. त्याची उजळणी मग मुंबईभर होत गेली. काही लोकांना रोजगार मिळाला, तर इतर लोकांना मोठ्या संख्येने हॉटेलात महाग पदार्थ वाटणार्‍यांना स्वस्तातला नाश्ता मिळू लागला. पण त्याच दरम्यान असे प्रयोग विविध आवश्यक वस्तुंच्या विक्रीसाठीही होऊ लागले. त्यातून एक शब्दावली निर्माण झाली. ‘शिवसेना पुरस्कृत किंमत कमी.’ सेनेच्या शाखा वा तिच्या जवळ कुठेतरी मोसमी वस्तुंची अशी विक्री चालायची. तिथे असा फ़लक नक्की असायचा. त्यामुळे त्याचा उपयोग वगनाट्यकार म्हणून लोकप्रिय झालेले शाहिर दादा कोंडके यांनी आपल्या नाटकातही करून घेतला होता. अशा अनेक आघाड्यांवर शिवसेनेचा तरूण व्यस्त असताना तसा कुठलाही कार्यक्रम अन्य पुरोगामी वा बिगरकॉग्रेसी पक्ष तरूणांसाठी राबवू शकले नाहीत. 

आपली संघटना लोकोपयोगी असल्याचे मनात ठसवण्यासाठी हे तरूण तेव्हा अखंड राबत होते. तुमची कुठलीही समस्या असू द्या, शाखेत या आणि निराकारण करून घ्या; असा एक प्रघात मुंबईत प्रत्येकांच्या मनात तयार होऊ लागला. सामान्य माणसाच्या समस्या खुप किरकोळ व नगण्य असतात. त्यांचे निराकरण आंदोलनाशिवाय होऊ शकते. याचा साक्षात्कार त्यातून मतदाराला होत गेला. पालिकेच्या कर्मचार्‍यांकडून नागरिकांची होणारी अडवणूक किंवा दिला जाणारा त्रास नवीन नव्हता परंतु शिवसेनेच्या धाकामुळे आता नागरिक शिवसेना शाखेत येवून तक्रार करु लागले. मग नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचा तात्काळ निपटारा व्हावा व सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचे नगरसेवक थेट हाणमारीपर्यंत जात होते आणि जिथे नगरसेवक नाही, तिथे शाखाप्रमुखही अंगावर धावून जाण्याइतका आक्रमक असायचा. त्यातून धाक निर्माण होत होता आणि सरकारी कर्मचारी व कार्यालये त्यामुळे शिवसेनेला व शिवसैनिकांना वचकून राहात होते आणि ज्याची अडवणूक झाली आहे, त्याला आपल्यासाठी शिवसेना पक्ष व शिवसैनिक लढत आहे याची जाणिव होत होती. अश्या प्रकारे सेनेची लोकप्रियता वाढत गेली. 

बारीकसारीक कामासाठी, अडचणीसाठी सेनेच्या शाखेत धावणे हा स्थानिक नागरिक रहिवाश्यांसाठी परिपाठ बनत गेला. त्यापूर्वी राजकीय संघटना वा पक्षांचे काम असे होत नसे. बैठका वा चर्चा आणि समस्येचा उपाय म्हणून थेट आंदोलनाचा पवित्रा, हे राजकीय कार्यक्रम होते. सेनेला ही पद्धत पसंद नव्हती. सेनेत लोकशाही नाही असे बाळासाहेब वारंवार तेव्हा सांगत होते आणि त्याचप्रमाणे शिवसेना ही संघटना चालत होती. तिला कुठले मुख्यालय नव्हते की तिची कार्यकारिणी वगैरे भानगडी नव्हत्या. बाळासाहेबांनी संघटना बांधणी केली आणि त्यात शिवसेनाप्रमुख हे सर्वोच्च पद निर्माण केले. त्यानंतर नेते, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक एवढीच पदे सुरवातीला निर्माण केली परंतु बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझा शिवसैनिक हाच सर्वोच्च पदाधिकारी आहे. त्यामुळे शिवसैनिक या पदाला नेहमीच मानसन्मान मिळत गेला.   
शेखर चंद्रकांत भोसले
मुलुंड

संबंधित पोस्ट