बसपाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव, कॅडर गुरू प्रा.भाऊसाहेब गोंडाणे यांचे दुःखद निधन

नागपूर: बसपाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा.भाऊसाहेब गोंडाणे यांचे बुधवार दि. २१ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वा. निधन झाले. प्रा. गोंडाणे यांना कोव्हिडचा संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या २५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. चळवळी साठी मला जगायचंय म्हणून यातून मी लवकर बरा होईल असा आशावाद आणि इच्छाशक्ती त्यांच्याजवळ होती. कोव्हिड मधून ते पूर्ण बरेही झाले होते परंतु त्यांना श्वासोच्छवासचा त्रास जाणवत होता. त्यांची ऑक्सिजनची पातळी सतत घसरत होती, हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे त्यांना त्यातून सावरता आले नाही. अखेर २५ दिवसांची त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी वैशालीनगर, मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवास त्यांची एकुलती एक मुलगी समृद्धी हिने अग्नी दिला. प्रा. गोंडाणे यांच्या पश्चात  पत्नी विजया आणि मुलगी समृद्धी असा परिवार आहे. 

 बसपाचे संस्थापक कांशीराम यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळीला गतिमान करण्याचे काम केले. कांशीराम यांनी पेटवलेली ही मशाल सतत धगधगत ठेवण्यासाठी धडपडणारे प्रा. भाऊसाहेब गोंडाणे खऱ्या अर्थाने एक मिशनरी योद्धे होते. प्रचंड व्यासंग, जनसंपर्क, बहुजनांच्या प्रश्नांची असलेली जाण आणि त्यावर करीत असलेले क्रियाशील काम यामुळे ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी थेट जोडलेले होते. सगळे कार्यकर्ते भाऊसाहेबांना आपला गुरु मानत. बसपा चळवळीचा पाया असलेल्या कॅडर कॅम्पद्वारे त्यांनी अनेक प्रामाणिक, चळवळीशी निष्ठावान असलेले कार्यकर्ते तयार केले. ते कॅडर शिक्षक म्हणून सगळीकडे ओळखले जायचे. मात्र प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्याला अंतर्गत राजकारणाला बळी पडावे लागते आणि तेच भाऊसाहेबांच्या बाबतीतही झाले. पक्षाशी निष्ठा, राजकीय अनुभव आणि दांडगा जनसंपर्क असूनही भाऊ साहेबांना पक्षात महत्वाचे पद मिळाले नाही याची खंत भाऊसाहेबां पेक्षा त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना जास्त वाटत असे. 

महाराष्ट्रात बसपाची ताकद नामशेष होत असताना नागपूरमध्ये मात्र टिकून ठेवण्यात भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. भाऊसाहेबांकडे कार्यकर्त्यांचे संघटन करण्याची  कला होती. ज्येष्ठ, तरुण, महिला सर्वांना सोबत घेऊन ते काम करीत असे म्हणून प्रा. गोंडाणे सारखा दांडगा जनसंपर्क असलेला कार्यकर्ता आपल्या पक्षात असावां यासाठी अनेक राजकीय पक्षांचे नेते प्रयत्नशील होते. परंतु भाऊसाहेबांनी कायम निष्ठेला प्राधान्य दिले. भाऊसाहेब चळवळीला आपलं जीवन मानत होते. चळवळ गतीमान करण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहिले. प्राध्यापकाची नोकरी सोडून ते पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले. स्वतःच संपूर्ण आयुष्य त्यांनी पक्षासाठी समर्पित केलं होत. चळवळीसाठी करीत असलेल्या त्यांच्या या संघर्षात पत्नी विजया यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, माझ्या पत्नीने घर संसाराची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली नसती तर मी चळवळीला योगदान देऊ शकलो नसतो असे ते प्रांजळपणे कबूल करीत असतं. 

भाऊसाहेबांवर कार्यकर्त्यांचा विशेष लोभ होता. भाऊसाहेबांच्या उपचारात पैशाची कमतरता पडू नये म्हणून कार्यकर्त्यांनी पदरमोड करीत निधीही जमवला होता. परंतु पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या उपचाराबांबत योग्य ती दखल घेत नसल्याने कार्यकर्ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर नाराज होते आणि ही नाराजी कार्यकर्त्यांनी आदर्श महाराष्ट्रकडे व्यक्तही केली होती. प्रा.भाऊसाहेब गोंडाणे यांच्या  निधनाने फुले शाहू आंबेडकर चळवळीची फार मोठी हानी झालेली असून त्यांच्या मार्गदर्शनाची कमतरता आम्हाला कायम भासत राहील अशी भावना शोकाकुल कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट