
मुंबईत आता सर्वच दुकाने खुली होणार, ५ महिन्यानंतर मिळाली परवानगी
- by Reporter
- Aug 03, 2020
- 932 views
मुंबई (प्रतिनिधी) : कधीच न थकणाऱ्या आणि थांबणाऱ्या मुंबईचा वेग कोरोना व्हायरसमुळे मंदावला होता. गेली ५ महिने मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनलॉकच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकारने सुरु केली असून मुंबईची सर्वच दुकाने आता सुरु होणार आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन लावल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे पहिल्यांदाच एवढे दिवस मुंबईत दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
लॉकडाऊन हटविल्यानंतरही सरकारने निवडक दुकानांनाच परवानगी दिली होती. आता मात्र सरसकट सगळ्याच दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आलीय. त्याचबरोबर दारूची विक्री करणाऱ्या दुकानांना काउंटरवर विक्री करण्यास परवानगीही देण्यात आली आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला जात आहे. यातच ५ ऑगस्टपासून जिम आणि योगा इन्स्टिट्यूट खुली करण्यात येणार आहे. मात्र यासाठी काही नियमावली लागू करण्यात येणार आहे. याबाबत नियमावली लागू केली आहे आणि सर्व संस्थांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, निरोगी रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. गेल्या २४ तासांत ५२ हजार ९७२ रुग्णांची नोंद झाली तर, ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी एकाच दिवसात ५० हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ०३ हजार ६९६ झाली आहे. यातील ५ लाख ७९ हजार ३५७ रुग्ण अक्टिव्ह आहेत. तर ३८ हजार १३५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
या सगळ्या दिलासादायक बाब म्हणजे देशात तब्बल २ कोटी लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी एकाच दिवसात ३.१८ लाख लोकांचा चाचण्या करण्यात आल्या. तर, देशात एकाच दिवसात जवळजवळ ४१ हजार रुग्ण निरोगी झाले आहे. यासह एकूण निरोगी रुग्णांची संख्या आता ११ लाख ८६ हजार झाली आहे. यासह देशाचा रिकव्हरी रेट ६५.८% झाला आहे.
रिपोर्टर