वाढदिवसाच्या निमित्ताने विराटला आलेलं एका खास व्यक्तीचं पत्र

पत्र लिहिणारी व्यक्ती ही विराटला सर्वात चांगल्या पद्धतीने ओळखते...

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात नव्या जोमाच्या खेळाडूंचं एक नवं पर्व सुरु झालं तेव्हाच या पर्वामध्ये एक असा चेहरा सर्वांसमोर आला ज्याने पाहता पाहता आपल्या दमदार खेळाच्या बळावर क्रिकेट जगतात एक वेगळीच सुरुवात केली. आजच्या पिढीच्या गळ्यातील ताईत असणारा हा चेहरा म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार, विराट कोहली. नावाप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानातही दमदार आणि विराट अशी कामगिरी करणाऱ्या या खेळाडूवर आज (५ नोव्हेंबर) वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

विविध स्तरांवरुन प्रत्येकजण आपल्या परिने त्याला शुभेच्छा देण्यात व्यग्र असतानाच एका खास व्यक्तीने विराटला या अतिशय महत्त्वाच्या आणि खास दिवशी पत्र लिहिलं आहे. ही व्यक्ती त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने ओखळते. आता तुम्ही म्हणाल ती विराटची आई किंवा पत्नी अनुष्काच असावी.... तर तसं नाही.

विराटला पत्र लिहिणारा हा खुद्द विराटच आहे. काहीसं अनपेक्षित असलं तरी हेच खरं आहे. वयाच्या पंधराव्या वर्षात असणाऱ्या स्वत:च्या बालमनाची समजूत काढण्यासाठी म्हणून वयाची तीस वर्षे ओलांडलेल्या विराटनेच एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून बालपणीच्या रुसव्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन विराटने 'चिकू'समोर मांडला आहे.

तुझ्या मनात अनेक प्रश्न असतील पण, त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही असं म्हणत विराटने चिकूसाठी लिहिलेल्या पत्राची सुरुवात केली. 'प्रत्येक अनुभव हा थरारक असतो आणि प्रत्येक निराशा, संधी ही शिकण्यासाठी असते. तुला हे आज कळणार नाही. पण, कोणा एका ठिकाणी पोहोचण्यापेक्षा त्या ठिकाणी पोहोचण्यासाठीचा प्रवासच अधित महत्त्वाचा असतो.... आणि प्रवास असतोच मुळात सर्वोत्तम.

मी तुला हे सांगू इच्छितो विराट, की जीवनात तुझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी राखून ठेवल्या आहेत. पण, तरीही तुझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संधीसाठी तू मात्र तयार असणं अपेक्षित आहे. संधी मिळेल तेव्हा तिचं सोनं कर, तुझ्याकडे असणारी कोणतीच गोष्ट गृहित धरु नकोस. अपयशी होशील, सर्वजण होतात. मला एकच वचन दे की पुन्हा नव्य़ा जोमाने उभं राहण्यास तू विसरणार नाहीस. पहिल्या खेपेस ताही जमलं नाही, तर पुन्हा त्यासाठी प्रयत्न कर.

अनेकांचं प्रेम तुला मिळेल. काणीजणांना तू आवडणारही नाहीस किंबहुना ते तुला ओळखतही नसतील. त्यांची पर्वा तू करु नकोस. स्वत:वर विश्वास ठेव', असं लिहित आयुष्यात येणाऱ्या संधीकडे दुर्लक्ष करु नकोस हा महत्त्वाचा संदेश त्याने दिला.
पत्राच्या अखेरच्या टप्प्यात त्याने वडील आणि कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवत लिहिलं, 'मला ठाऊक आहे, आज तुला बाबांनी न घेतलेल्या त्या शूजविषयीच तू विचार करत आहेस. बाबांच्या मिठीशी, त्यांनी तुझ्या उंचीवरुन केलेल्या एखाद्या विनोदाशी त्या शूजची तुलना केल्यास त्यांची किंमत नगण्य आहे. हे क्षण जप. ते कधीकधी जास्तच शिस्तप्रिय वागतात. पण, तुला एक चांगली व्यक्ती करण्यासाठीच ते असं करत आहेत. पालक आपल्याला कधीकधी समजून घेत नाहीत असं तुला वाटत असेल.पण, एक लक्षात ठेव की, कुटुंबाकडून तुम्हाला नि:स्वार्थ प्रेम मिळतं. त्यांनाही तू तितकंच प्रेम दे, त्यांचा आदर कर, त्यांच्यासोबत वेळ व्यतीत कर. बाबांना सांग की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. आज ते प्रेम व्यक्त कर, उद्याही व्यक्त कर.... हे प्रेम संधी मिळेल तेव्हा व्यक्त करत राहा.'

पत्राच्या शेवटच्या ओळींमध्ये स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नकोस, असं म्हणत मोठी स्वप्न पाहणं कशा प्रकारे मोठे बदलही घडवून आणतं हे जगाला दाखवून दे सांगणाऱ्या विराटने आईच्या हातल्या पराठ्याचेही मनापासून आभार मानले. अतिसय खुल्या मनाने लिहिलेल्या या पत्रातून विराट अगदी खुल्या मनाने सर्वांसमोर आला आहे.


संबंधित पोस्ट