सुंठी वाचून खोकला गेला

   महाराष्ट्राच्या राजकारणात दलित मुस्लिम हा एक मोठा आणि निर्णायक फॅक्टर आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून काँग्रेसवाल्यांनी दलित मुस्लिमांच्या जोरावरच सत्ता उपभोगली. पण त्या बदल्यात दलित मुस्लिमांना फार काही मिळाले पण आज देशात जो हिंदुत्वाचा ढोल वाजवला जातोय त्याचे पडसाद देशभर उमटायला लागलेत. त्यामुळेच भाजपला अच्छे दिन आलेत पण देश मात्र २०० वर्ष मागे जात आहे. कारण हिंदुत्वाच्या आडून आर.एस.एस सारख्या सनातनी संघटना या देशातील बहुसंख्य असलेल्या दलित,मुस्लिम,ओबीसी,आदिवासी या उपेक्षित समाजाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि तेही देवा धर्माची भीती दाखवून. अशावेळी सनातनी हिंदू वगळून जर सर्व समाज एकत्र आला तर भारताची जी धर्मनिरपेक्ष प्रतिमा आहे ती टिकून राहील आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही चपराक बसेल. याच भावनेतून दलित मुस्लिम ऐक्याचे प्रयोग झाले. काही वर्षांपूर्वी जोगेंद्र कवाडे आणि हाजी मस्तान यांनी दलित मुस्लिम महासंघाकडून दलित मुस्लिमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी तो प्रयोग यशस्वी झाला नाही. कदाचित हाजी मस्तान यांच्या गुन्हेगारी पार्शवभूमीमुळे मुस्लिम त्यांच्या जवळ आले नसावेत. पण या प्रयोगामुळे दलित मुस्लिमांचा वापर करून घेणाऱ्या काँग्रेसला मात्र चांगलाच धडा मिळाला. त्यानंतर अनेक वर्षांनी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने पुन्हा दलित मुस्लिमांना एकत्र आणण्याचा प्रयोग प्रकाश आंबेडकर यांच्या सारख्या जनमानसात स्वच्छ प्रतिमा आणि प्रभाव असलेल्या नेत्याने केला. यावेळी वंचित या शब्दातच उपेक्षितांचा आवाज असल्याने दलित आदिवासी,आणि ओबीसीही वंचितच्या झेंड्याखाली एकवटले आणि त्याला ओवेसींच्या एमआयएमची साथ मिळाली. त्यामुळे वंचितच्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपा युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या तोंडाला फेस आणला. काँग्रेस राष्ट्रवादीचे तर वंचितमुळे पानिपत झाले. पण चंद्रकांत खैरे सारखे युतीचे दिग्गज नेते पराभूत झाले. प्रत्येक मतदार संघात वंचितच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. औरंगाबाद मतदार संघातून वंचितच्याच तिकिटावर एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वंचितची ताकद समजली. पण अपेक्षित जागा मात्र मिळाल्या नाहीत. त्यामुळे असे का झाले याची जेंव्हा वंचित कडून समीक्षा करण्यात आली तेंव्हा प्रकाश आंबेडकरांना धक्का बसला. कारण वंचितला दलित ओबीसींची तर मते मिळाली पण मुस्लिमांची मते मिळाली नाहीत. म्हणूनच औरंगाबाद सोडून उर्वरित ४७ मतदारसंघात वंचितचे  उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत. औरंगाबाद मध्ये इम्तियाज जलील जे निवडून आले ते दलितांच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर आज तेच इम्तियाज जलील वंचितवर टांग वर करून स्वबळाची फुशारक्या मारीत आहेत. जर एमआयएम वंचित मध्ये असूनही मुस्लिमांची मते वंचितच्या मिळत नसतील तर आघाडीत राहून एमआयएम चा फायदा काय? ओवेसी जे हैद्राबाद मधून सलगपणे निवडून येतायत ते स्वतःच्या ताकदीवर नाहीत तर टी.एस.आर पार्टी आणि चंद्रशेखर राव यांच्या कुबड्या घेऊन लोकसभेत जात आहेत. त्यामुळे ओवेसींनी जास्त फुशारक्या मारू नयेत आणि संपूर्ण मुस्लिम समाज आपल्या सोबत आहे असेही समजू नये. उलट मुस्लिम समाज मुल्ला मौलवींचे ऐकतो. त्यामुळे मशिदीतून ज्या रंगाची बांग दिली जाईल त्याच रंगावर मुस्लिम समाज शिक्का मारतो मग तो भगवा रंग असला तरी त्यांना चालतो. त्यामुळे ओवेसी आणि इम्तियाज जलील सारख्यांना कोण विचारतोय? म्हणूनच प्रकाश आंबेडकरानी एमआयएमला त्यांच्या राजकीय कुवतीनुसार ८ जागा देऊ केल्या होत्या. पण वंचित आणि दलितांच्या ताकदीवर निवडून आलेले जलील सध्या हवेत आहेत. जणू काही अख्खा महाराष्ट्र आपण जिंकला असे त्यांना वाटू लागले. म्हणूनच ते आघाडीतून बाहेर पडले. पण वंचितला त्याचा जराही फरक पडणार नाही. उलट सुंठी वाचून खोकला गेला हीच भावना आज वंचितला मानणाऱ्या लोकांमध्ये आहे. आता घोडा मैदान लांब नाही. बघूया.. इम्तियाज जलील आपल्या किती उमेदवारांचे डिपॉझिट वाचवतात. मुस्लिम समाज हा विखुरलेला आहे. काही ठराविक मतदार संघात जरी मुस्लिमांचे प्राबल्य असले तरी तिथला मुस्लिम ओवेसीं बरोबर फरफटत जाणार नाही. कारण मुस्लिम समाजात काही चांगले आणि लोकांची कामे करणारे कार्यकर्ते आहे अशांना वंचितने हेरून उमेदवारी दिल्यास इम्तियाज जलील आणि ओवेसींना याच निवडणुकीत त्यांची औकात कळेल. वाईट फक्त एकच गोष्टीचे वाटते की बिचारा मुस्लिम समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या फारसा प्रगल्भ नाही आणि त्याच्या याच कामजोरीचा गैर फायदा आजवर काँग्रेस घेत होती आता ओवेसी सारखे लोक घेण्याचा प्रयत्न करतील. पण त्यात त्यांना यश येणार नाही. तसेच मुस्लिमांना नेहमीच पाण्यात बघणारे कट्टर हिंदुत्ववादी आता अधिक जोमाने मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील. वंचितच्या माध्यमातून महाराष्ट्रातला दलित ओबीसी भक्कमपणे मुस्लिमांच्या पाठीशी उभा होता. त्यामुळे निदान महाराष्ट्रात तरी मुस्लिमांना त्रास देण्याची कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचे हिम्मत झाली नाही. पण मुस्लिम समाज लोकसभा निवडणुकीत फारसा गंभीर दिसला नाही. तो जर ताकदीने वंचितच्या मागे उभा राहिला असता तर लोकसभा निवडणुकीत वेगळे चित्र बघायला मिळाले असते आणि हीच वस्तुस्थिती प्रकाश आंबेडकरानी एमआयएम ला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. इम्तियाज जलील म्हणत आहेत की वंचित मध्ये आरएसएसचे लोक शिरलेत आणि प्रकाश आंबेडकर त्यांचे ऐकून निर्णय घेतात. पण त्यांच्या या आरोपात काहीच तथ्य नाही. उलट प्रकाश आंबेडकर हे आरएसएस सह सगळ्याच हिंदुत्ववाद्यांच्या कट्टर विरोधक आहेत. तर एमआयएम हीच भाजपची 'बी' टीम आहे असा आरोप होतोय त्याचा अगोदर जलील यांनी खुलासा करावा. थोडक्यात वंचितने इम्तियाज जलील आणि ओवेसींना आरसा दाखवला होता पण त्यात दिसणारे एमआयएम चे कमजोर प्रतिबिंब बघण्याची ओवेसींची हिम्मत झाली नाही म्हणून ते वंचित म्हणून बाहेर पडलेत... हरकत नाही खुदा हाफिज! 


रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट