ठाण्यात वाहतूक शिस्तीचे वारे!

मुख्य रस्त्यांवर गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंगची अंमलबजावणी

ठाणे (प्रतिनिधी):ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांमधील वाहनकोंडी कमी व्हावी आणि शहरातील अपघातांची संख्या आणखी कमी व्हावी यासाठी वाहतूक विभागाने केलेल्या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांच्या निगा आणि देखभालीसाठी विविध कामे करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार रस्ते मार्गिका, गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजक, लुकलुकणारे दिवे शहरातील वेगवेगळ्या भागात बसविण्यात येणार असून नादुरुस्त पदपथ आणि गटारावरील झाकणांच्या दुरुस्तीची कामेही मोठय़ा प्रमाणावर हाती घेतली जाणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत पोखरण एक  आणि दोन, नितीन कंपनी ते कामगार रुग्णालय, वाघबीळ, कळवा आणि मुंब्रा या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. त्यापैकी पोखरण एक आणि दोन रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे पूर्ण झाली असून या रस्त्यावर रस्ते मार्गिका, गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजक, लुकलुकणारे दिवे बसविण्यात आले आहेत. असे असले तरी शहरातील काही मुख्य रस्त्यांवरील रस्ते मार्गिका, गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजक, लुकलुकणारे दिवे नसल्याचे चित्र दिसून येते. काही रस्त्यांवरील सततच्या वाहतुकीमुळे झेब्रा क्रॉसिंगचा रंग फिकट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे वाहनचालकांकडून काटेकोरपणे पालन होत नसून त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. याशिवाय, रस्ते मार्गिका आणि दुभाजकांची रंगरंगोटी नाहीशी झाल्याने या ठिकाणी वाहन धडकून अपघात होऊ शकतात.

या पाश्र्वभूमीवर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्त्यांच्या निगा व देखभालीसाठी विविध कामे करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या आधारे महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांच्या निगा व देखभालीसाठी विविध कामे करण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला असून तो येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या कामासाठी तीन कोटी ९६ लाख २६ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते नागरिकांना ओलंडणे शक्य व्हावे यासाठी झेब्रा क्रॉसिंगची कामे करण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्याचबरोबर रस्ते मार्गिका, दुभाजक, लुकलुकणारे दिवे अशी कामे करण्याची मागणी केली होती. या गोष्टींमुळे वाहतुकीला शिस्त लावणे सोपे होणार आहे.

अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

महापालिका क्षेत्रातील पोखरण रस्ते वगळून उर्वरित रस्त्यांच्या देखभालीसाठी विविध कामांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पोलीस आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या आधारे केलेल्या या प्रस्तावात मार्गिका, गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग, दुभाजक, लुकलुकणारे दिवे बसविणे, पदपथ व गटारांच्या झाकणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

रवींद्र खडताळे, नगर अभियंता, ठाणे महापालिका

संबंधित पोस्ट