गिरणगावात शिवशाहू प्रतिष्ठानचा गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात

मुंबई : लोककल्याणकारी राजा राजर्षि शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षीही  "कोल्हापूर जिल्हा रहिवासी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई" यांच्या वतीने नुकतेच  ना. म. जोशी मुन्सिपल शाळा, डिलाईल रोड, लोअर परळ येथील शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व विभागातील ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विभागातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच  लोकशांती को.ऑप.क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष विलास पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. 


कार्यक्रमासाठी विभागातील विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती लक्षणीय होती. कोविड काळातील लॉकडाऊन, त्यातच बंद असणाऱ्या शाळा अशा अवस्थेत घरीच असणारे सर्व विद्यार्थी व पालक यांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज घेत प्रमुख वक्त्या आरती बनसोडे यांनी विद्यार्थी यांच्यासह पालकांनाही बोलते केले. आजची सोशल मीडिया, मोबाईल, इंटरनेट यांचा दैनंदिन जीवनातील अतिवापर आणि त्यामुळे बंद होत असलेला बालक- पालक सुसंवाद याबाबतीत विस्तृत मार्गदर्शन केले. आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट, व नियोजनबद्ध अभ्यासाबरोबरच आपल्याकडे असलेल्या मर्यादित वेळेचा आपण कसा वापर करतो हे पण महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एका वर्षाचे, एका महिन्याचे, एका आठवड्याचे, एका तासाचे, एका मिनिटाचे व एका सेकंदाचेही महत्व किती आहे हे उदाहरणाचे दाखले देत त्यांनी विशद केले. यशाला अजिबात शॉर्टकट नाही हे सांगतानाच पालकांनीही आपल्या दैनंदिन वेळातून किमान एक तास आपल्या पाल्याना देत अभ्यासाबरोबर त्यांच्यावर सुसंस्कार करावेत, जेणेकरून देशाचे भविष्यातील सवेंदनशील व जबाबदार नागरीक म्हणून त्यांना आत्मसन्माने जगता येईल.

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर यांनी उपस्थितांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींच्या विश्वासार्ह बातमीसाठी वर्तमानपत्र वाचनाचे महत्व सांगत, सर्वानी वृत्तपत्र वाचावे असे आवाहन केले.

या सामाजिक उपक्रमासाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील दानशूर व्यक्ती संस्था यांनी वस्तू तसेच आर्थिक स्वरूपात हातभार लावला. यामध्ये "महावीर इंटरनॅशनल मुंबई" या संस्थेने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या वॉटर बॉटल उपलब्ध करून दिल्या. या मदतीबद्दल दातृत्वांच्या हातांचे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबलेल्या सर्व कार्यकर्ते यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार प्रतिष्ठानचे सचिव कृष्णा पाटील यांनी मानले.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ख्यातनाम समुपदेशक सौ. आरती बनसोडे, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर, विजय रावराणे, जीवन भोसले, जागृती मंचचे अध्यक्ष राम साळगांवकर, उद्योजक नितीन कोलगे, योगा प्रशिक्षिका प्रज्ञा पवार, ज्येष्ठ महिला प्रतिनिधी माई मंगला भोसले यांच्या सह शिवशाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र देसाई, कार्याध्यक्ष राजू येरुडकर, हेमंत मोरे, अक्षय पाटील  यांची उपस्थिति लाभली.

संबंधित पोस्ट