मुंबई,नवी मुंबई ,ठाणे,पालघर मध्ये पावसाचे थैमान
- by Adarsh Maharashtra
- Sep 04, 2019
- 2007 views
*प्रचंड अतिवृष्टीने मुंबईसह महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत
*मध्य,हार्बर व पश्चिम रेल्वे ठप्प,लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द
*दादर,वरळी ,हिंदमाता,सायन,मिलन सबवे,अंधेरी आदी भगत पाणी तुंबल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
*गणेश मंडपांमध्ये पाणी शिरल्याने वीज बंद ठेवण्याच्या उत्सव मंडळांना सूचना
*वसई विरार मधील रस्त्यांचे नदी नाल्यात रूपांतर
*पुढील २४ तासात मोठी अतिवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा इशारा
मुंबई (विशेष प्रतिनिधी): गणेश चतुर्थी पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने काल मुंबई,नवी मुंबई,ठाणे,पालघर,पुणे ,गडचिरोली आदी जिल्ह्यांना अक्षरश झोडपून काढले. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी तुंबल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तर मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवाही रखडत सुरू होती. पण दुपारी १२ नंतर तीही ठप्प झाली. त्यामळे घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. पावसाचा जोर लक्षात घेऊन काल शाळा कॉलेजनाही सुट्टी देण्यात आली.
सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर आभाळ फटल्याप्रमाणे कोसळत होता. त्यामुळे सकाळी मध्य,पश्चिम आणि हार्बर मार्गावरची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. पण नंतर पावसाचा वेग वाढल्याने तसेच रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे काही लोक मधेच अडकून पडले. मुंबई शहरात २१४ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला तर पूर्व उपनगरात १३१.४९ मिमी आणि पश्चिम उपनगरात १४५.६५ मिमी इतका पाऊस पडला. मध्य रेल्वेच्या कुर्ला, माटुंगा, माहीम,ठाणे या रेल्वे स्टेशनवरील ट्रॅक वर पाणी आले होते. त्यामुळे रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली तर पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा, अंधेरी, लोअर परेल, प्रभादेवी या ठिकाणीही पाणी साचल्याने चर्चगेट ते अंधेरी लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे पुढे विरार पर्यंतची वाहतूकही थांबवण्यात आली. या पावसामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सीएसटी,बांद्रा आणि कुर्ला टर्मिनन्स वर बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती.
मुंबईच्या सायन,हिंदमाता,वरळी ,अंधेरी सबवे, मिलन सबवे, माहीम, बांद्रा, वडाळा, चुनाभट्टी, कुर्ला या भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात बेस्टच्या अनेक बसेसही अडकल्या होत्या. त्यामुळे बेस्टची सेवाही कोलमडून पडली. पावसाचा जोर आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शाळा कॉलेजांना सुट्टी देण्यात आली. मुंबई पाठोपाठ पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. वसई, नालासोपारा आणि विरार येथील सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. रिक्षाही रस्त्यावर फारशा नव्हत्या. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. वसईतील काही गणेश मंडपांमध्ये पाणी शिरलेले दिसत होते. ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने गणेश भक्तांना दर्शनासाठीही बाहेर पडता आले नाही. पुण्यातही प्रचंड पाऊस झाला. खडकवासला धरण पूर्ण भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्यासाठी तीन दरवाजे काही फुटांपर्यंत उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला. पाऊस इतका होता की प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली गेला आणि वाहतूक बंद करावी लागली. ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने ठाणे शहरासह कल्याण ,डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, शहापूर या शहरांमध्ये पाणी तुंबून लोकांचे खूप हाल झाले. हवामान खात्याने पुढील २४ तास आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबईत आणि ठाण्यात पुढच्या २४ तासांत अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अतिवृष्टी होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम