विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

खाद्यप्रेमींनी एकदा इथे भेट दिलीच पाहिजे

मुंबई : विराट कोहली हा अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. फक्त क्रिकेट प्रेमीच नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी विराट आदर्शस्थानी आहे. एक व्यक्ती, खेळाडू म्हणून त्याचा वावरसुद्धा अनेकांसाठी फार महत्त्वाचा ठरतो. क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या विराटने आता त्याचा मोर्चा एका वेगळ्या गोष्टीकडे वळवला आहे. 

स्वत: एक खवैय्या असणाऱ्या विराटने त्याची ही आवड इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी one8 commune नावाचं एक नवं हॉटेल सुरु केलं आहे. नुकतंचएका मुलाखतीत त्याच्या या हॉटेल सुरु करण्यामागच्या संकल्पनेचा उलगडा करण्यात आला. शिवाय one8 commune मध्ये मिळणाऱ्या काही पदार्थांवरही प्रकाशझोत टाकला गेला. 

'कर्ली टेल्स'शी संवाद साधताना विराटने हे हॉटेल नेमकं सुरु तरी कसं झालं यावरुन पडदा उचलला. 'बालपणापासूनच घरात खाद्यापदार्थांविषयीच्या चर्चा, बरेच पदार्थ यांची रेलचेल होती. त्यातच दिल्लीच्या रस्त्यांवर मिळणारे चटपचीत पदार्थसुद्धा भरीला होतेच', असं सांगत आपण खाद्यप्रेमी असल्याचं विराटने या मुलाखतीत सांगितलं. one8 commune हे एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी विराटच्या आवडीच्या पदार्थांचीही चव चाखता येत आहे.

हॉटेल व्यवसायात उडी मारण्याची विराटची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा त्याने भावाखाद्य व्यवसायात उडी घेतली होती. नवी दिल्लीत सुरु झालेलं one8 commune हे one 8 या त्याच्या ब्रँडअंतर्गत येणारं हॉटेल असल्यामुळे ते अधिक खास  ठरत आहे. फक्त दिल्लीपुरताच सीमीत न राहता, येत्या काळात मुंबईतही या हॉटेलची शाखा सुरु करण्याचा विराटचा मानस आहे. 

विराटचं one8 commune हे दिसायला जितकं आलिशान आहे तितकाच त्याचा मेन्यूही खास आहे. या मेन्यूमध्ये आहेत विराटच्या आवडीचे हटके पदार्थ तुमचंही लक्ष वेधून जाणारे आहेत. सुपरफूड सॅलड, मश्रूम गुगली, क्विनोआ बोल आणि इतरही पदार्थ जिभेचे चोचले पुरवण्यासोबतच आरोग्यास पूरक आहाराची जाणिव करणारे आहेत.

आरोग्यास पूरक आणि तितक्याच चवीच्या पदार्थांसाठी विराटने शेफला फक्त त्याच्या आवडीनिवडी सांगितल्या आणि त्यानंतरची सारी किमया केली ती म्हणजे हॉटेलच्या शेफने. दिल्लीतील एका पंजाबी आणि मांसाहार प्रेमी कुटुंबातील विराट सध्या शाकाहाराला प्राधान्य देतो. शिवाय तो जवळपास ९० टक्के व्हिगनही आहे. त्यामुळे आहारातील त्याच्या या सवयी हॉटेलच्या मेन्यूतही परावर्तित होत आहेत.  तेव्हा दिल्लीत गेलात तर विराटच्या या हॉटेलला नक्की भेट द्या.

संबंधित पोस्ट