नळावरील भांडण ठरलं जीवघेणं, २३ वर्षीय तरुणाने गर्भवतीच्या पोटावर लाथ मारल्याने बाळाचा मृत्यू

आपल्या आईला मारहाण होत असल्याचे पाहून गर्भवती तिला वाचवण्यासाठी पुढे गेली आणि...

मुंबई (प्रतिनिधी) :  भांडुपमधील एका चाळीत नळावर पाणी भरताना झालेल्या वादात एका २३ वर्षीय तरुणाने गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारली होती. यामुळे तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात २३ वर्षीय तरुणाला कोर्टाने न्यायालयाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली आणि तो तरुण असला तरी त्यांच्या कृत्यामुळे बाळ दगावले होते आणि त्याला दया दाखविल्यास गर्भवती महिला सुरक्षित नसल्याचा चुकीचा संदेश समाजात पसरेल असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम.उमर यांनी नोंदविले होते. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील भांडूप भागातील ही घटना आहे. मनोज कराखे असं शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक नळावर पाणी भरताना पीडित महिला सविताच्या आईसोबत मनोज हा भांडण करीत होता. काहीवेळाने तो पीडितेच्या आईला मारहाण करीत असल्याचे पाहताच ती त्याला अडवण्यासाठी मधे आली. त्यातचं मनोजने सविताच्या पोटावर जोरात लाथ मारली. यामुळे ती खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. यानंतर तिला तातडीने जवळील रुग्णालयात हलविण्यात आले.

शीव रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर ते बाळ दगावल्याची माहिती समोर आली. यानंतर पीडितेच्या पती व कुटुंबीयांनी मनोजविरोधात गुन्हा दाखल केला. या खटल्यात सात साक्षीदारांच्या साक्षही घेण्यात आल्या होत्या. आरोपीच्या वकिलाने पीडिता गर्भवती असल्याचे आरोपीला माहित नसल्याचा युक्तिवाद केला. यावर आरोपी हा पीडितेच्या नात्यामधला असल्याने त्याला सविता गर्भवती असल्याचे माहित असल्याचा युक्तिवाद पीडितेच्या वकिलाने केला. यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीवर दया न दाखवता त्याला साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावली.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट