विक्रमगडमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची हेळसांड

■ रुग्णांना निकृष्ट जेवण व असुविधा असल्याचा नातेवाईकांचा आरोप

पालघर (जयेश शेलार/7जून):विक्रमगड तालुक्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात ठेवण्यात आलेल्या रुग्णांची अक्षम्य हेळसांड होत असल्याची गंभीर बाब समोर आली असून या रुग्णांना दिले जाणारे जेवण निकृष्ट असल्याची तक्रारही येथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्याने या ठिकाणच्या कोविड सेंटरची व्यवस्था बघणाऱ्या प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

विक्रमगड तालुक्यातील शीळ येथे असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी वाडा व विक्रमगड तालुक्यात पॉझिटिव्ह आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात आले आहेत, मात्र सदर रुग्णांची प्रशासनाकडून हेळसांड सूरु असून या रुग्णांना पुरविण्यात येणारे जेवण निकृष्ट असल्याची तक्रार सदर रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. सदरच्या रुग्णांना पौष्टिक व सकस जेवण देणे आवश्यक असतांना अगदी साधे व तेही निकृष्ट पद्धतीचे दिले जात आहे. या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी त्यांना दूध, अंडी व इतर पौष्टिक वस्तू देणे आवश्यक असताना फक्त साधे जेवण दिले जात आहे.  

तर हे जेवणही वेळेवर दिले जात नसून दररोज  उशिराने दिला जात आहे. या रुग्णांना गरम पिण्याचे पाणी देणे आवश्यक असतांना साधे पाणी दिले जात असल्याने याचा परिणाम रुग्णांच्या मानसिकतेवर होत असल्याचाही या रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. 

या कोविड सेंटरमधील रुग्णांच्या अनेक तक्रारी असून या ठिकाणचे स्वच्छतागृहात अस्वच्छता असून रुग्णांना आंघोलीसाठीही गरम पाणी उपलब्ध नाही तर याच ठिकाणी कोरोनटाईन ठेवलेल्या 50 रुग्णांनाही या सेंटरमधील अपुऱ्या  सुविधा पुरविण्यात येत असल्याने आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान या ठिकाणी ठेवलेल्या रुग्णांमध्ये आरोग्य सेवेतील कर्मचारी रुग्णही असून त्यांच्या बाबतही आरोग्य यंत्रणा हेळसांड करीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर याबाबत विक्रमगडचे  आरोग्य  अधीक्षक विजय कालबंडे यांना विचारले असता या रुग्णांना जेवण पुरविण्याचे कंत्राट जिल्हा स्तरावरून एका खाजगी व्यक्तीला संस्थेला देण्यात आले असून याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगितले.

संबंधित पोस्ट