भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार जाहीर; यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे

अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दिला जाणार कै. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार, संपादक तथा महाराष्ट्रातील  एक वक्ते मधुकर भावे यांना जाहीर झाला आहे. भगवानराव लोमटे यांच्या स्मृती दिनी १९ सप्टेंबर २०१९ रोजी हा पुरस्कार  महात्मा गांधी मिशन (एमजीएम) अध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.यावर्षीचा हा सातवा पुरस्कार गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता प्रदान करण्यात येईल. अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समिती संस्थेचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
हा पुरस्कार दरवर्षी राज्यपातळीवर सुसंस्कृत राजकारणी, साहित्य, क्रीडा, ललितकला, नाट्य व सिने अभिनेता, संगीत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, सहकार व शिक्षण या क्षेत्रातील एका मान्यवरांस दिला जातो. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार यशवंतराव गडाख-पाटील,(डॉ. वासुदेव मूलाटे व पं. नाथराव नेरळकर) विजय कुवळेकर,(कुलगुरू पंडित विद्यासागर व प्राचार्य रा.रं. बोराडे) ना. धों. महानोर,(डॉ.जब्बार पटेल) रामदास फुटाणे,(प्रा. भास्कर चांदनशिव) पं. नाथराव नेरळकर(डॉ. जनार्दन वाघमारे) व विजय कोलते (प्रा. लक्ष्मिकांत तांबोळी) यांना प्रदान करण्यात आला आहे. ( कंसातील नावे ज्यांच्या हस्ते दिला त्यांची आहेत.)

मधुकर भावे यांचा परिचय
आचार्य प्र. के. अत्रे यांच्या मराठा या वृत्तपत्रातून त्यांची पत्रकारिता सुरू झाली. अत्रे यांचा प्रदीर्घ सहवास त्यांना लाभला. त्यांचे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत. एखाद्या बातमीचे शीर्षक त्यांना आवडले नाही तर अत्रे भावेंना ते शीर्षक लिहिण्यास सांगत. इतका विश्वास त्यांच्यावर होता. त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे असं मराठी व महाराष्ट्रातील जनतेला वाटत होते. यासाठी आंदोलन झाले त्यात भावे यांचा सहभाग होता. पुरोगामी विचारसरणी व कार्यपद्धती भावे यांची होती. पुढे त्यांनी अनेक नावाजलेल्या वृत्तपत्रातून पत्रकारिता केली. पुढच्या काळात आधुनिक छपाई यंत्रे आली. पत्रकारितेला नवा आयाम मिळाला. दैनिक लोकमत मध्ये त्यांनी पत्रकारिता सुरू केली. मंत्रालय व विधिमंडळ यांचे संयुक्त वार्तांकन करताना अनेक मुख्यमंत्री, मंत्री व अधिकारी यांच्याशी संबंध येत असत. पत्रकारितेत त्यांनी सर्वाना न्याय दिला व जिथे चुका झाला तिथे ओरखडेही ओढले. लोकमत, एकमत व प्रहार या दैनिकांच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. एकूणच सार्वजनिक जीवनातही, राज्यकर्त्यांबद्दल अवाजवी प्रेम किंवा अकारण आकस या सार्वत्रिकपणे आढळणा-या प्रवृत्तीला त्यांनी स्वतःजवळ कधी फिरकू दिले नाही, ही खरोखरच फार मोलाची बाब आहे. मनिषा प्रकाशना'च्या वतीने त्यांनी पाहिलेल्या महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांचा दस्ताऐवज पुस्तकरुपाने प्रकाशित होतो आहे. हे ग्रंथ भविष्यातील अभ्यासकांना संदर्भासाठी उपयुक्त ठरतील. पत्रकारितेबरोबरच 'वक्ता' म्हणूनही महाराष्ट्राला त्यांची  ओळख आहे.  त्यांची अनेक विषयांवरील व्याख्याने तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. विशेषतः यशवंतराव चव्हाण यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी  यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गाव-खेड्यांत जाऊन दिलेली शंभर व्याख्याने कुणीही विसरू शकणार नाही.
महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्यामोठ्या शहरातील ग्रामीण भागातील पुढाऱ्यांच्या कार्यपद्धती, दृढमैत्री व आवाका,त्या पुढाऱ्यांच्या गावातील उद्योग, शिक्षण, शेती  आदींची त्यांना इतंभूत माहीत असलेले ते एकमेव पत्रकार असतील. भगवानराव लोमटे बापू व भावे यांचे घनिष्ठ संबंध होते. बापूंनी सावज व्यासपीठ ही संस्था स्थापन केली. बापू आचार्य अत्रे यांचे भक्त होते. त्यांच्या नावे पत्रकारिता पुरस्कार सुरू केला. पहिला पुरस्कार अंबाजोगाई टाइम्सचे संपादक ईश्वरचंद्र गुप्ता यांना दिला. तो भावे यांच्या हस्ते. तेंव्हा ते लातूरला एकमतचे संपादक होते. त्यांनतर तो पुरस्कार राज्य पातळीवर देण्याचे ठरले. त्यातला पहिला पुरस्कार लोकमतचे मुख्यसंपादक राजेंद्र दर्डा यांना आर. के. लक्ष्मण यांच्या हस्ते दिला. त्या पुरस्कार निवड समितीचे प्रमुख म्हणून भावे यांनी काम केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट