केडीएमसीतून वगळलेल्या गावांतील विकासकामे थांबवण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण (श्रीराम कांदू) : कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या गावांत सुरू असणारी विकासकामे थांबवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र हे आदेश अन्यायकारक असून स्थगिती देण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवत त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

वेगळी नगरपालिका बनवण्यासाठी केडीएमसीतून २७ गावांपैकी १८ गावे वगळण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी या १८ गावांतील केडीएमसीच्या लोकप्रतिनिधींचे नगरसेवक पदही रद्द करण्याचे आदेश केडीएमसी प्रशासनाने दिले होते. त्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी नविन आदेशानुसार या १८ गावात महापालिका निधीमधून सुरू असणारी कामे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आयुक्तांचा हा निर्णय इथल्या नागरिकांवर अन्यायकारक असल्याचे आमदार राजू पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान याबाबतची ४५१ खालील एक याचिका प्रलंबित असून सेवा सुविधा, विकासकामे थांबवण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशावर त्वरित स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच १८ गावांच्या नियोजित नगरपालिकेसाठी त्वरित प्रशासक नेमावा, कोरोना महामारीच्या काळात प्रस्तावित नगरपालिका निर्णायकी ठेवणे योग्य नसल्याचेही आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

संबंधित पोस्ट