कोट्यवधीचा नफा कमावण्याचे आमिष दाखवून सहा जणांकडून सात जणांना 24 लाखांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी) : ऑनलाईन ट्रेडिंगचा व्यवसाय करून पाच वर्षांत प्रत्येकी सहा कोटी रुपयांपर्यंत नफा कमावण्याचे आमिष दाखवून सात जणांना 24 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणूक प्रकरणी तन्मय अतुल पटेल (वय 31, रा. अवधूत बंगलो, कर्णनगर, आरटीओ कार्यालयाच्या मागे, दिंडोरी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की प्रवीण बोरगुडे, वैभव बोरसे, दीपक सैंदाणे, धीरज नाईर, पुष्कराज गोसावी व वंशिका हरदास मालाणी (रा. नाशिक) यांनी संगनमत करून तन्मय पटेल, अनिता विजय नेरीकर (वय 37, रा. आर्या रेसिडेन्स, सुचितानगर, हॉटेल रसोईमागे, इंदिरानगर), शीतल बाळासाहेब पठारे (वय 30, रा. औदुंबर पार्क, खुटवडनगर, अंबड), भूषण विठ्ठल महाजन (वय 29, रा. श्रीसमर्थ कृपा हिंदी स्कूलजवळ, श्रमिकनगर), स्वप्निल पांडुरंग देवरे (वय 30, रा. शिवाजी चौक, बडदे मळ्याजवळ, जुने सिडको), प्रशांत वाल्मीक वरखडे (वय 30, रा. व्हिजन छाया रो-हाऊस, जाचक मळा, जय भवानी रोड, नाशिकरोड), रोशनी ललित धाडीवाल (वय 31, रा. वेदांत, श्रीकृष्णनगर ड्रीम सिटीजवळ, बोधलेनगर) या सात जणांशी संगनमत करून सहा जणांनी विहान डायरेक्टर सेल इन इंडिया प्रा. लि. या कंपनीमध्ये गुंतवणूक करून भागीदारी देण्याचे आश्‍वासन दिले.

या कंपनीत ऑनलाईन ट्रेडिंगचा व्यवसाय करून पाच वर्षांत प्रत्येकी सहा कोटी रुपयांपर्यंत प्रत्येक जण नफा कमावू शकतो, असे आमिष दाखविले. एवढ्या मोठ्या नफ्याचे आमिष ऐकून त्यांनी ऑनलाईन ट्रेडिंगचा व्यवसाय करण्यास संमती दर्शविली. यातूनच संशयित सहा भामट्यांनी सात जणांशी 23 लाख रुपयांची फसवणूक करून विश्‍वासघात केला. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी पैशांची मागणी केली असता “तुम्ही पोलिसांत तक्रार केली, तर तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकवू,” अशी धमकी दिली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. परदेशी अधिक तपास करीत आहेत.

संबंधित पोस्ट