पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या प्रयत्नातून रायगडकरांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न लवकरच येणार पूर्णत्वास
- by Reporter
- Jul 20, 2020
- 609 views
बोरघर/माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० रुग्ण खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्याबाबत दिनांक ३१ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी हे महाविद्यालय लवकर सुरू करण्याबाबत तसेच पुढील कार्यवाही होणेबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे विनंती केली होती. त्याअनुषंगाने आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उद्योग व खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय तसेच माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी हे सहभागी झाले होते.
या बैठकीत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अलिबाग नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रूग्णालय स्थापनेबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे, या जागेची मोजणी करून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी सूचना केली.
वैद्यकीय संचालनालयाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी पुढील कार्यवाही तात्काळ करून भारतीय आयुर्विज्ञान परिषद/ केंद्र शासनाकडे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रूग्णालय सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासित केले आहे.
रिपोर्टर