अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा क्षेत्रामध्ये दक्षतेने कार्यरत

नवी मुंबई - मागील दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

काल रात्रीपासूनच पावसाचा वाढता जोर पाहून आज आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त ड़ॉ. बाबासाहेब राजळे यांच्या समवेत संपूर्ण महापालिका क्षेत्राचा पाहणी दौरा केला व विविध ठिकाणांना भेटी देत, त्यातही पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांना भेटी देत संपूर्ण नवी मुंबई क्षेत्राची स्थिती प्रत्यक्ष अवलोकन केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर दक्षतेने कार्यरत राहण्याच्या सूचना देत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. यामध्ये कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी पाणी उपसा पंपांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा तसेच स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांनी कुठेही कचरा साचून वाहत्या पाण्याला प्रतिबंध होणार नाही याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असून 17 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून 18 तारखेला सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 88.20 मि.मि. तसेच 18 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून 19 तारखेला सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 45.83 मि.मि. पावसाची नोंद झालेली आहे.

त्याचप्रमाणे आज 19 जुलै रोजीही मागील दोन दिवसांचा आवेग कायम ठेवत पहाटेपासून मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 73.36 मि.मि. पावसाची नोंद झालेली आहे.

यामध्ये बेलापूर विभागात 99.60 मि.मि., नेरूळ विभागात 84.10 मि.मि., वाशी विभागात 64.30 मि.मि., कोपरखैरणे विभागात 45.00 मि.मि., ऐरोली विभागात 67.40 मि.मि. व दिघा विभागात 79.80 मि.मि. अशाप्रकारे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 73.36 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.

या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण केंद्रामार्फत पाच अग्निशमन केंद्रे आणि आठ विभागीय कार्यालये या ठिकाणच्या आपत्ती निवारण कक्षांना दक्ष व मदत कार्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.

आपत्ती नियंत्रण कक्षात प्राप्त माहितीनुसार सेक्टर 11 सीबीडी बेलापूर येथील पेट्रोल पंपाजवळ तसेच पटणी रोड येथील ऐरोलीतील गणपती मंदिराजवळ झाड पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यास अनुसरून अग्निशमन विभागाने त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचून रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या कटरने कापून व रस्त्यातून हटवून वाहतुकीला होणारा अडथळा दूर केला आहे.

त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने अतिवृष्टी आणि भरतीची वेळ जुळून आल्यास शहरात काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे निदर्शनास येते‌. आज दुपारी 1.23 वा. हा 4.25 मीटर इतक्या उंचीच्या भरतीचा कालावधी असल्याने ठाणे-बेलापूर रोड येथील सविता केमिकल्स समोर तसेच सीबीडी सेक्टर एक येथील बेलापूर बस डेपो समोर पाणी साचल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी मदतकार्य पुरविण्यात आले.

अशा मोठ्या प्रमाणावरील पर्जन्यवृष्टीच्या स्थितीत नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत राहावे या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी सर्वच विभाग प्रमुखांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले होते तसेच परिमंडळ एक व परिमंडळ दोनच्या उपायुक्तांना क्षेत्रीय स्तरावर पाहणी करण्याचेही निर्देश दिले होते त्यास अनुसरून परिमंडळ उपायुक्त आणि प्रमाणित अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनीही पाहणी दौरा करत महापालिका क्षेत्रातील पर्जन्यस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि संबंधितांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.

महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा दक्ष असून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण जाणवल्यास त्यांनी महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण केंद्राशी 1800222309/1800222310 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 022 - 27567060/61 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आहे.

संबंधित पोस्ट