घरगुती काढ्याने घात केला, बाप-लेकाचा मृत्यू, फलटण हादरले
फलटण- सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती बनवलेल्या काढ्यामुळे बाप आणि लेकाचा मृत्यू झाला आहे. अवघ्या काढ्याच्या औषधामुळे येथील पोतेकर कुटुंबाचा मोठा घात झाला आहे. या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. फलटण पोलिस याचा तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील फलटण नारळी-बाग भागात पोतेकर कुटुंब राहते. या कुटुंबाचा काढ्याने घात केला. पुण्याला नोकरीनिमित्त असलेल्या या पोतेकर कुटुंबातील अमित हा दुपारी घरी येणार होता. आठवड्यातून एकदा येणाऱ्या या मुलासाठी आई-वडिलांनी बाजारातून कोंबडा आणला. कोंबडा संपूर्ण कुटुंबाने खाल्ला. संपूर्ण दिवस एकमेकांशी गप्पा टप्पात गेला. संध्याकाळी भाजी चपाती आणि त्यासोबत आर्धी पोळी खाली. झोपण्याची वेळ आली. त्यावेळी मुलाचा थोडा घसा खवखवत होता म्हणून आईने सर्वांसाठी नेहमीप्रमाणे घरगुती काढा बनवला. काड्यामध्ये आलं-लसूण पुदिना गूळ याचा वापर केला. या सर्वाचं नेहमी-प्रमाणे मिश्रण करून या कुटुंबातील तिघांनी तो पिला. यात पुण्याहून आलेला मुलगा अमित, वडिल हणमंतराव आणि मुलगी श्रध्दा या तिघांचाही समावेश होता. मुलाची आई संगिताने काढा पिला नाही. काढा पिल्यानंतर अवघ्या काही वेळातच बाप-लेकाला मळमळणं, जुलाब, उलट्या असा त्रास होऊ लागला. आई संगीता यांना काय करावे सुचेना. त्यांना तातडीने जवळच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रात्री १२ वाजता सर्वांना दाखल केले.उपचार सुरू असताना सकाळी साडेसहा वाजता संगिताच्या पतीने प्राण सोडला तर पंधरा मिनिटानंतर यांच्या मुलानेही प्राण सोडला. मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
बापलेकाच्या जाण्याने पोतेकर मायलेकी हडबडल्या आहेत. काढ्याने घात केला असलातरी यात अॅडमिट केल्यापासून ते सकाळपर्यंत यांना एक सलाईन लावण्या व्यतरिक्त काहीच उपचार दिले नाहीत. तसेच त्यांच्यावर उपचार उपस्थित एका नर्सकडून करण्यात आले. सकाळी डॉक्टर आले तेव्हा सर्व संपले होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, फूडपॉइझन हे या काढ्यामुळे झाले असावे का? असा प्रश्न सध्या अनेकांना भेडसावत आहे. या प्रकरणाची सध्या साताऱ्यात चर्चा सुरु आहे.
या घटनेची नोंद फलटण शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस सखोल तपास करत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल शेळके यांनी दिली. दरम्यान, वेळेवर उपचार मिळाले नाहीत असे जरी सांगितले जात असले तरी हा त्रास नेमका काढ्याने झाला की आणखी काही कारण असू शकते, हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजणार आहे.
रिपोर्टर
REPORTER
आदर्श महाराष्ट्र वेब टीम