फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल वाशी येथे नवी मुंबईच्या पहिल्या डायबेटिक फूट क्लिनिकचा शुभारंभ

नवी मुंबई -नवी मुंबई,  वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी नवी मुंबईतील पहिल्या “डायबेटिक फूट क्लिनिक चे उद्घाटन झाले. या क्लिनिकमुळे आता मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या गरजांवरील सर्वांगिण उपचार एकाच छताखाली मिळू शकणार आहेत. नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त श्री. संजय विलासराव मोहिते (आय. पी. एस) आणि १९८४ पासून डायबेटिक फूट शस्त्रक्रियांच्या क्षेत्रात कार्यरत असलेले सुप्रसिद्ध डायबेटिक फूट सर्जन डॉ. अरुण बाळ यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन झाले. हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील इंटर्नल मेडिसीन विभागाच्या संचालक डॉ. फराह इंगळे या सेंटरच्या प्रमुख असतील व त्यांच्या टीममध्ये डॉ. रोजी फिलिप, कन्सल्टन्ट – जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जरी; डॉ, अतुल इंगळे सीनिअर कन्सल्टन्ट – नेफ्रोलॉडी व ट्रान्स्प्लान्ट फिजिशियन; डॉ. अनिल पोतदार, डिरेक्टर आणि हेड कार्डिओलॉजी आणि डॉ. पवन ओझा, सीनिअर कन्सल्टन्ट – न्यूरोलॉजी यांचा समावेश असणार आहे. 

मधुमेहाच्या रुग्णांना डायबेटिक फूटसह अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. बरेचदा या रुग्णांच्या पावलांना पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नसल्याचे जाणवते. या गोष्टीचा त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो, चालणे कठीण होते व गंभीर प्रकरणांमध्ये पाय शस्त्रक्रियेने कापून टाकावा लागतो. या समस्येकडे वेळच्यावेळी लक्ष पुरविणे आणि रुग्णांना अत्यावश्यक अशा शस्त्रक्रियात्मक व वैद्यकीय उपाययोजना पुरविणे हा या क्लिनिकचा हेतू आहे. या क्लिनिकद्वारे स्क्रिनिंग, पॅथोलॉजी, जखमांची देखभाल, शस्त्रक्रियात्मक उपचार आणि इतर उपचार प्रक्रियांसह अनेक सोयीसुविधा पुरविल्या जातील. 

या क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी सन्माननीय पाहुणे, नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त श्री. संजय विलासराव मोहिते (आय. पी. एस) म्हणाले, “मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पावलांशी संबंधित समस्या सर्रास दिसून येतात, ज्यांच्याकडे लक्ष देणे व डॉक्टरांच्या टीमच्या परस्पर समन्वयातून त्यावर उपचार केले जाणे आवश्यक आहे. या समस्यांचा रुग्णाच्या आयुष्यावर विपरित परिणाम होण्यापूर्वी त्यांच्यावर उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या मते याबाबतीत रुग्णांना आवश्यक असलेल्या देखभालीच्या उपलब्धतेत असलेल्या त्रुटी भरून काढण्याच्या दृष्टीने आणि वेळच्या वेळी मिळालेले उपचार व प्रतिबंधात्मक कृतींमुळे होणाऱ्या दीर्घकालीन फायद्यांबद्दल मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे क्लिनिक म्हणजे एक सुधारणावादी पाऊल आहे.”

सुप्रसिद्ध डायबेटिक फूट सर्जन डॉ. अरुण बाळ म्हणाले, “भारतामध्ये मधुमेहाचे ७.८ कोटी रुग्ण आहेत, ज्यापैकी १५ टक्के लोकांमध्ये पायांच्या समस्या आढळून येतात. या १५ टक्के लोकांपैकी १ टक्का लोकांना आपला पाय गमवावा लागतो. मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाने वर्षातून एकदा आपल्या पायाची तपासणी करून घेतली आणि आपल्या नसा, रक्तवाहिन्या व सांध्याचे काम कसे चालले आहे हे तपासून घेतले तर ही समस्या टाळता येण्याजोगी आहे. मात्र, बहुतांश रुग्ण आपल्या हातापायांकडे दुर्लक्ष करतात आणि त्याऐवजी डोळे, किडनी, हृदय इत्यादींच्या नियमित तपासण्या करून घेण्यास प्राधान्य देतात. पावलांचा अल्सर असलेल्या रुग्णांची संख्या प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि त्वचरोगांचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. तसेच पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिजिज ( रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा येणे) असलेल्या मधुमेहींमधील मृत्यूचे प्रमाण खूप अधिक असून ही संख्या  स्वादुपिंड व फुफ्फुसांच्या कॅन्सरखालोखाल सर्वाधिक आहे. असे असूनही पावलांची तपासणी नियमितपणे केली जात नसल्यामुळे या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंची ही मोठी संख्या दुर्लक्षित राहत आहे.”

फोर्टीस नेटवर्कच्या वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन विभागाच्या संचालक डॉ. फराह इंगळे म्हणाल्या, “टाइप १ आणि टाइप २ डायबेटिसचा त्रास असलेल्या कोणत्याही वयोगटातील रुग्णाच्या बाबतीत डायबेटिक फूटची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच या रुग्णांनी साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि लवकरात लवकर उपचार घेतले पाहिजेत. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात असणे हे मधुमेहाच्या रुग्णांमधील संसर्गावर उपचार करण्याच्या दृष्टीने तसेच नवीन संसर्गांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. या रुग्णांनी डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत संपूर्ण शरीराची काळजी घ्यायला हवी आणि म्हणूनच आमची बहुशाखीय टीम अशा रुग्णांच्या देखभालीची योजना आकारास आणण्यासाठी व त्यांना योग्य ते उपचार देण्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहे.”

या क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना फोर्टिस नेटवर्कच्या वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलचे फॅसिलिटी डिरेक्टर श्री. नीतिन कमारिया म्हणाले, “डायबेटिक फूट समस्यांची व्याप्ती खूप मोठी आहे; हे क्लिनिक सुरू करणे हे या समस्या हाताळण्याच्या, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत करण्याच्या आणि प्रतिबंधास मदत करणाऱ्या नियमित तपासण्यांविषयी जागरुकता येऊन त्याची माहिती घरोघरी पोहोचविण्याच्या हेतूने उचललेले एक सुधारणावादी पाऊल आहे. हे क्लिनिक म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्वांगिण उपचार पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

संबंधित पोस्ट