आम्ही सावित्रीच्या लेकी अभिमान व्यक्त करीत महिलांनी साकारले कलासंस्कृतीचे रंग

नवी मुंबई:पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रणी समाजसुधारक, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या विशेष सोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विविध स्पर्धा उपक्रमांतून आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडविले. त्यामधील सर्वोत्तम सादरीकरण करणा-या महिलांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी व विजेत्या महिलांचे पारितोषिक देऊन कौतुक करण्यासाठी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परवाना विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, समाजविकास अधिकारी श्री. सर्जेराव परांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेविका श्रीम. शुभांगी पाटील, श्रीम. शशिकला पाटील, श्री. राजू शिंदे हे देखील उपस्थित होते.

सेक्टर 8, कोपरखैरणे येथील शिवराज्य प्रतिष्ठान पुरस्कृत शिवाई महिला समुह यांना यावर्षीचा मानाचा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार” हा आमदार श्री. गणेश नाईक व आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे पुरस्काराचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र स्विकारून पुरस्काराची रु.21 हजार इतकी रक्कम पुरस्कार विजेत्या संस्थेने नवी मुंबई महानगरपालिकेस विद्यार्थी व बालकांच्या कल्याणकारी योजनांसाठी परत केली. त्यांच्या या दातृत्वाचे सर्व उपस्थितांनी मुक्तकंठाने कौतुक केले. 

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांनी शिक्षणाचे ध्येय नजरेसमोर ठेवून अनेक अडचणींना तोंड देत, जिद्द न सोडता सावित्रीबाईंनी स्वत: शिकून इतरांना शिक्षित करण्याचे काम केले अशी प्रेरणा त्यांच्या चरित्रातून आपल्याला मिळते असे सांगत नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच महिलांच्या प्रगतीसाठी नवनव्या संधी उपलब्ध करून देत असल्याचे म्हटले. यापुढील काळात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीकरिता सर्व आठही विभागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी महानगरपालिकेस केल्या.

याप्रसंगी बोलताना बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी सावित्रीबाई फुले नसत्या तर आपण अशा नसतो असे सांगत महिलांमध्ये अनेक गोष्टींचे कौशल्य असते त्याला योग्य संधी मिळाली तर त्या संधीचे सोने केल्याशिवाय रहात नाहीत हे अनेक कर्तृत्ववान महिलांनी सिध्द केले आहे असे मत व्यक्त केले. नवी मुंबईच्या नावलौकीकात सर्वच घटकांचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगत त्यामध्ये महिलांचेही मोठ्या प्रमाणावर योगदान असल्याचे नमूद केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे चरित्र हे केवळ महिलांनाच नाही तर समाजातील प्रत्येक स्त्री – पुरुषाला प्रेरणा देणारे असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध महिला कल्याणकारी योजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे कोव्हिड प्रभावीत 2 वर्षांच्या काळानंतर सावित्रीबाईंच्या जयंती दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होत महिलांनी त्यांना उपलब्ध झालेल्या व्यासपीठाचा मोठ्या संख्येने कला गुण दाखवून लाभ घेतला ही आयोजक म्हणून महानगरपालिकेच्या दृष्टीने समाधानाची गोष्ट असल्याचे सांगितले.  

सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील गायन स्पर्धेत मंगला भोई, वैजयंता महामुनी व नुतन परब यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके पटकाविली.

नृत्य स्पर्धेत सानिका झावरे, सोनाली साळवे, साक्षी वडजे यांनी प्रथम, व्दितीय व तृतीय तसेच श्रेया पाटील यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक संपादन केले.

निबंध स्पर्धेत कंचन वर्मा, अंजली हजारे, दर्शना भोईर यांनी तसेच पाककला स्पर्धेत सुनिता काटकर, अस्मिता जाधव व ऋचीका भोईर यांनी अनुक्रमे 3 क्रमांकाची पारितोषिके संपादन केली.

सलाड सजावट स्पर्धेत सारिका भोईर, उषा रेणके व प्राजक्ता रानकर यांनी त्यांचप्रमाणे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धेत मिरा मंडलीक, नेहल घरत व हर्षाली रानकर यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केला.

अशाच प्रकारे विभागनिहाय घेतलेल्या रांगोळी व मेहंदी स्पर्धेतील प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येक विभागासाठी 3 पारितोषिके प्रदान करण्यात आली.

पारितोषिक विजेत्यांना रु.3000/-, रु.2000/- व रु.1000/- रक्कमेची पारितोषिके सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रासह मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.

“आम्ही सावित्रीच्या लेकी” म्हणत मोठ्या संख्येने महिला या सर्व कलागुणदर्शनपर स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी झाल्या व त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी नवी मुंबईकर महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट