वाढवण बंदर रद्द करा, मुंबई बडोदा हायवेच्या समस्यांबाबत आ. निकोले यांचे विधानभवनात जोरदार आंदोलन

नागपूर / डहाणू. (प्रतिनिधी) –  पालघर डहाणूतील जनतेला उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी वाढवण बंदर रद्द करा आणि मुंबई - बडोदा सुफरफास्ट हायवे, रेल्वे फ्रेड कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या आदी मागण्यांकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून विधानभवन पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, पालघर जिल्ह्यात डहाणू येथील वाढवण येथे होऊ घातलेल्या बंदराला सबंध जनतेचा विरोध आहे. हे बंदर जे फक्त 2 - 4 मोठमोठ्या उद्योगपतींच्या हितासाठी आणले जाते आहे. या बंदरामुळे पालघर पासून गुजरात सीमे लगत असलेल्या उमरगाव पर्यंतच्या मच्छीमार उध्वस्त होणार आहे. त्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातील शेतकरी, चिक्कू बागायतदार देखील उध्वस्त होणार आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात असे अनेक प्रकल्प आणले जात आहेत. पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन, मुंबई - बडोदा सुफर-फास्ट हायवे, रेल्वे फ्रेड कॉरिडॉर प्रकल्प, सूत्रकार - वेलूगाव हायवे आदी - ज्या शेतकऱ्यांच्या जागा संपादित केल्या आहेत असे आदिवासी, बिगर आदिवासी तसेच अल्प भूधारक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळालेला नाही. तसेच वाढवण बंदर झाल्यानंतर त्याची जी काही वाहतूक होणार आहे त्याकरीता देखील उक्त भागात पुन्हा जमीन संपादित केल्या जाणार आहेत आज जोर जबरदस्तीने जमिनी संपादित केल्या जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा विरोध असताना पण, हे सरकार गतीने वाढवण बंदर करण्याचे काम सुरु केले आहे असे का ? असा प्रश्न आ. निकोले यांनी उपस्थित केला. तसेच संपूर्ण पालघर जिल्ह्यामधील आदिवासी शेतकरी व येथील जनता या विनाशकारी वाढवण बंदर च्या विरोधात रस्त्यावर उतरणारच आहे. त्याचबरोबर आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून विधानभवन पायऱ्यांवर निदर्शने करत आहोत. आणि या वाढवण बंदराला आमचा तीव्र विरोध आहे. तसेच मुंबई - बडोदा सुफरफास्ट हायवे पूर्णतः फार मोठा असा प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जागा हा सुफरफास्ट हायवे मध्ये संपादित झाल्या आहेत तिला जो 7 / 12 तो गोळा आहे. त्यात अजून कोणाची जागा कोणती हे निश्चित झालेले नाही त्यामुळे जो काही तेथील शेतकरी आहे त्यालाही मोबदला न मिळता ज्याची जमीन संपादित झाली आहे त्याला मोबदला न मिळता इतर व्यक्तील मिळाला आहे. हा मोठ्याप्रमाणावर झालेला भ्रष्टाचार झालेल्या आहे. या बाबत देखील आंदोलन करत आहोत. तसेच या उक्त प्रश्नी  आम्ही सभागृहात मविस नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचना दिली असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले.


तसेच दरम्यान आ. निकोले यांनी फलक झळकावून पालघर जिल्ह्यातील रुग्णालयात आरोग्य सुविधा सुधारा, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा जोरदारपणे घोषणा दिल्या. याप्रसंगी आमदार राजेश पाटील, आ. सुनील भुसारा, आ. डॉ किरण लहामटे आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट