
फक्त एक दिवस डॉ.बाबासाहेब बना ! पत्रकार गुणाजी काजिर्डेकर यांचे आवाहन
नवी मुंबई : गेल्या सहासष्ट वर्षात आम्ही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त मानलं पण जाणून न घेतल्यामुळे सामाजिक व राष्ट्रीय स्तरावर दोलायमान स्थिती निर्माण झाली. म्हणूनच आमुलाग्र बदल हवा असेल तर महामानव डॉ.बाबासाहेबांना डोक्यावर न घेता, बाबासाहेबांचा मेंदू डोक्यात घ्या. अभिनेते अनिल कपूर यांचा एक दिवसाचा मुख्यमंत्री अर्थात नायक हा चित्रपट गाजला. त्याचप्रकारे एक दिवस बाबासाहेब बना आणि आंदोलने, परिषदा घ्या, संघर्ष करा, म्हणजे त्याग काय असतो याची कल्पना येईल.असे आवाहन पत्रकार गुणाजी काजिर्डेकर यांनी केले.
ब्ल्यू लिबरेशन मिशन या संस्थेच्या विद्यमाने कांजूरमार्ग येथील एस आर ए कंपाऊंड येथे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तक दिन कार्यक्रमात काजिर्डेकर यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले. अध्यक्षस्थानी दिनेश विनेरकर होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश हिवाळे, सेक्युलर मूव्हमेंटचे गौतम सांगळे, आणि बौ.पं.समितीचे बौद्धाचार्य व गट प्रतिनिधी द्रुपद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
धम्मक्रांतीची ६६ वर्षे उलटली अर्थात ७ दशकाकडे वाटचाल सुरू असून, आजही लोकांना संघटीत होण्यासाठी कार्यकर्त्यांकरवी वेळोवेळी आवाहन करण्याची वेळ यावी ही अत्यंत शर्मनाक बाब असून, असंघटीतपणाचे हे चित्र असेच राहिल्यास भविष्यात फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीतीही गुणाजी काजिर्डेकर यांनी व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेबांची जगातील सहा विद्वानांमध्ये गणना होते, ज्यांनी स्वातंत्र्योत्तर भारताचे संविधान लिहून लोकशाहीचा पाया घातला. मात्र लोकशाही व संविधानाला अभिप्रेत असलेली सामाजिक समता, स्वातंत्र्य व बंधुभाव या संविधानाच्या अधिष्ठानांची पायमल्ली होत असल्याचे लक्षात येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली नागपूर येथे धम्मदिक्षा घेऊन क्रांतीचा बिगुल फुंकला! देशभरात मागासवर्गीय समाज जातपातविरहीत अशा बौद्ध धम्माकडे वळत असल्याने रा.स्व संघाच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली असून, सरसंघचालक मोहन भागवत आता पापक्षालनाची भाषा बोलू लागलेत! खरेतर धर्मप्रणालीत सुधारणा अर्थात जातीपातीचे बिमोड झाल्याशिवाय समता येणार नाही हे प्रबोधनकार ठाकरेंनीही जाणले. त्यांनी १९२३ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. परंतु धर्माच्या वळचणीत जन्मालेल्या वि.दा.सावरकर यांनी लिहिलेल्या१९२३ साली हिंदू या पुस्तकाला संघाने डोक्यावर घेतले, याच पुस्तकावर संघाची उभारणी करण्यात आली. याबाबत हिंदू बांधव आजही अनभिज्ञ आहेत. असेही काजिर्डेकर यांनी म्हटले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर खरात,सुनील गायकवाड, संदीप खरात, सचिन गाडगे, संदेश साळवे, राजेश गायकवाड, मंदार हिवाळे, भानुदास गाडगे, अचल सातपुते, संदीप पाडमुख, महेश कांबळे, प्रकाश जाधव, लक्ष्मण लिंगायत, व अजय खरात यांनी खूपच परिश्रम घेतले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम