भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा; फलटणच्या अक्षता ढेकळेचा संघात समावेश

सातारा : बेल्जियम व नेदरलँड इथं होणाऱ्या (FIH 5) प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ  खेळणार असून सविता पूनिया हिच्या नेतृत्वाखाली २४ महिला खेळाडूंच्या हॉकी संघाची घोषणा शनिवारी करण्यात आलीय. यामध्ये वाखरी ता. फलटण येथील स्टार खेळाडू अक्षता आबासाहेब ढेकळे  हिचा संघात समावेश झाला आहे. 

(FIH 5) हॉकी महिला वर्ल्डकप पूर्वी होणाऱ्या या अतिमहत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय सर्वोत्कृष्ट २४ महिला खेळाडूंचा संघ पाठविण्यात येणार आहे. ज्युनियर वर्ल्डकप मध्ये चांगले प्रदर्शन केल्याबद्दल भारतीय संघाची युवा स्टार खेळाडू अक्षता आबासाहेब ढेकळे हिची निवड भारतीय महिला हॉकी वरिष्ठ संघात युरोप दौऱ्यासाठी करण्यात आलीय. अक्षता ढेकळे ही मूळची वाखरी ता. फलटण जि. सातारा येथील रहिवाशी असून ती महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेत पदार्पण करणारी पहिली महाराष्ट्रीयन खेळाडू आहे. यापूर्वी जर्मनी संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर वरिष्ठ संघात तिनं पदार्पण केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ज्यूनियर वर्ल्डकप स्पर्धेतही तिनं चांगली कामगिरी केली होती.

भारतीय महिला हॉकी संघ दि. ११ व १२ जून रोजी बेल्जियम देशात बेल्जियम संघाविरुद्ध २ सामने खेळणार आहे. त्यानंतर दि. १८ व १९ जून रोजी अर्जेंटिना संघा विरुद्ध २ व दि. २१ व २२ जून रोजी अनुक्रमे अमेरिकेविरुद्ध २ सामने खेळणार आहे. आगामी काही महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम्स व आशिया कप स्पर्धांसाठी या मॅचेस महत्वाच्या मानल्या जात आहेत.

भारतीय महिला हॉकी संघामध्ये गोलकीपर सविता पुनिया (कप्तान), बिचू देवी खरीबाम डिफेंडर : दीप ग्रेस एक्का (उप-कप्तान), गुरजीत कौर, निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, अक्षता ढेकळे. मिडफील्डर : निशा, सुशीला चानू पुखरामबम मोनिका, नेहा, ज्योती, नवजोत कौर, सोनिका, सलीमा टेटे, बलजीत कौर. फॉरवर्ड : वंदना कटारिया, लालरेम्सियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी, संगीता कुमारी, दीपिका, रानी यांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट