बाबासाहेब आम्हाला माफ करा!

तुम्ही दिलात आम्हा जन्म नवा
त्याचे सोने करता आले नाही!
सत्ताधारी होण्याचे स्वप्न तुमचे
आम्हास पूर्ण करता आले नाही!!

आज भारतीय घटनेचे थोर शिल्पकार भारतरत्न प.पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन! दरवर्षी बाबासाहेबांचे देशभरातील लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात. पण कोरोना मुळे गेल्या दोन वर्षांपासून यात काहीसा खंड पडलेला आहे. अर्थात ही परिस्थिती काही कायम राहणार नाही. कदाचित पुढच्या वर्षी परिस्थिती बदललेली असेल आणि दरवर्षी प्रमाणे पुढच्या वर्षी सुद्धा चैत्यभूमीवर गर्दीचा निळा महासागर उसळेल. पण गेली ६५ वर्ष आम्ही फक्त चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतोय मात्र त्यांच्या विचारांचा त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा कधी विचारच केला नाही. कारण बाबासाहेब नेमके कशात आहेत तेच आम्हाला कळलेले नाही कळले असते तर आज आम्ही दुसऱ्यांच्या मागे फरफटत गेलो नसतो. आणि आमची राजकीय परवड सुद्धा झाली नसती.
बाबासाहेबांनी जे त्यांच्या बालपणी पाहिलं, जे भोगल त्यातून धडा घेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढीत पुढे आले. आपल्या समाजानेही तशाच पद्धतीने पुढे येऊन राज्यकर्ती जमात बनवी असे बाबासाहेबांना वाटत होते आणि तेच त्यांचे स्वप्न होते पण ते समाजाला पूर्ण करता आले नाही याची खंत प्रत्येक महापरिनिर्वाण दिनी जाणवते. बाबासाहेबांनी आयुष्यभर प्रतिगामी शक्तींच्या विरोधात लढा दिला पण दुर्दैवाने आज त्याच प्रतिगामी शक्ती सत्ताधारी बनल्या आहेत आणि आमचेच काही लोक त्यांचे हात बळकट करीत आहेत. केवळ स्वतःच्या शुल्लक स्वार्थासाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. ही बाबासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा नाही का ? काँग्रेस असो की भाजप यांचा आंबेडकरी विचारांशी काडीचाही संबंध नाही आणि त्यांची आम्हाला गरज सुद्धा नाही उलट आमची त्यांना गरज आहे कारण आमच्या शक्तीवर ते सत्ताधारी बनलेत.आज बाबासाहेब हयात असते तर ते या पक्षांच्या सावलीलाही उभे राहिले नसते कारण बाबासाहेबांच्या पाया जवळ सुद्धा उभे राहण्याची त्यांची पात्रता नाही. पण आज मात्र बाबासाहेबांच्या समाजातील काही लोक प्रतिगाम्यांच्या मागे भरकटत चालले आहेत .अशा लोकांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. बाबासाहेबांच्या पश्चात इथल्या राजकीय पक्षांनी ज्यांचा मुखवटा भलेही सेक्युलर असेल पण प्रत्यक्षात ते सुद्धा जातीयवादीच असल्याने बाबासाहेबांच्या समाजाचा त्यांनी बुद्धिभेद केला. बाबासाहेबांच्या समाजाला त्यांनी बाबासाहेबांचे पुतळे, स्मारके आणि जातीचा गोल परीघ यात अडकवून ठेवले. बाबासाहेबांचे विचार जे पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध आहेत ते समाजा पर्यंत पोहचायला दिले नाहीत. त्यामुळे पुस्तकातील प्रज्ञावंत बाबासाहेब समाजाला, या देशाला आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीला कधी दिसलेच नाहीत. म्हणूनच बाबासाहेबांचा समाज राजकीय दृष्ट्या पुढे जाऊ शकला नाही. शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांची शिकवण जर प्रत्यक्षात अमलात आली असती तर आज या देशात प्रतिगामी शक्ती वाढल्याच नसत्या आणि आज याच प्रतिगामी शक्तींचा बाबासाहेबांच्या समाजाला, त्यांच्या संविधानाला आणि त्यांनी गोरगरिबांना मिळवून दिलेल्या आरक्षणाला धोकाही निर्माण झाला नसता.जे आज सत्तेत बसले आहेत त्यांना आरक्षण संपवायचे आहेत आणि दलित ,आदिवासी, भटके विमुक्त यांना पुन्हा वर्ण व्यवस्थेच्या वरवंट्याखाली चिरडून मारायचे आहे म्हणूनच आरक्षणात जास्तीत जास्त वाटेकरी निर्माण करून आरक्षणाचा  वाद इतका वाढवायचा आहे की उद्या लोकांमधूनच आरक्षण रद्द करण्याची मागणी होईल आणि सुंटी वाचून खोकला जाईल हाच या मागचा डाव आहे तो आंबेडकरी समाजाने ओळखायला हवा आणि यात केवळ शिवसेना भाजपच नव्हे तर काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा सामील आहेत कारण त्यांचा धर्म निरपक्षतेचा मुखवटा केंव्हाच गळून पडला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचा सेना भाजपला विरोध आहे पण त्यांनी कधी मनू च्या किंवा वर्णव्यवस्थेतील जातीची उतरंड यावर भाष्य केले आहे का, उलट त्यांचे नेते आजही कर्मकांडात विश्वास ठेऊन आहे. झग्यातून अंगठ्या काढून दाखवणारे अध्यात्मिक महाराज अनेक पुढाऱ्यांचे राजकीय गुरू आहेत या असल्या लोकांवर आम्ही विश्वास ठेवायचा का ? हे लोक बाबासाहेबांच्या समाजाचा तेंव्हाही वापर करून घेत होते आणि आताही वापर करून घेत आहेत तेंव्हा समाजाने या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. बाबासाहेबांचे स्वप्न जर युपी मध्ये पूर्ण होऊ शकते. तिथे स्वबळावर दलित मुख्यमंत्री बनू शकतो तर बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात का नाही बनू शकत याचा विचार प्रत्येकाने गंभीरपणे करायला हवा. त्यासाठी समाजाची एकजूट असायला हवी समाजाची एकजूट म्हणजे पुढाऱ्यांचे ऐक्य नव्हे. कारण पुढाऱ्यांचे दलित ऐक्य हा महाराष्ट्रात चेष्टेचा विषय बनलेला आहे. ते ज्यांच्या मागे फरफटत गेलेत त्यांना खुशाल जाऊ द्या पण समाजाने मात्र त्यांच्या मागे फरफटत जाऊ नये. आमचा एकच नेता, आमचे एकच नेतृत्व आणि आमचा एकच विचार तो म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर! आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फेकलेल्या चतकोराच्या मागे धावणाऱ्या कुठल्याही नेत्याची गरज नाही. हे आता आंबेडकरी जनतेने नेत्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे. कारण बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणारा कुठलाही आंबेडकरी अनुयायी शिवसेना भाजपच्या सावलीलाही थांबणार नाही कारण ज्यांच्या विरोधात बाबासाहेब आयुष्यभर लढले त्यांच्या विरोधात आम्हीही लढणार आणि एक ना एक दिवस त्यांच्या उरावर पाय ठेऊन सत्ताधारी होणार आणि बाबासाहेबांचे स्वप्न साकार करणार हाच आंबेडकरी जनतेचा निर्धार आहे.

रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट