फलटण शहरासह तालुक्यातील ८ गावे दि. ९ मे ते दि. १५ मे पर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप
- by Reporter
- May 08, 2021
- 1339 views
फलटण : फलटण शहर व तालुक्यातील वाढती कोरोना विषाणू संख्या विचारात घेऊन फलटण शहरासह तालुक्यातील ८ गावे रविवार दि. ९ मे ते शनिवार दि. १५ मे दरम्यान प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन ) म्हणून घोषित केले असल्याचे आदेश प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी काढले आहेत.
फलटण तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, तरडगाव, वाठार निंबाळकर, जाधववाडी ही ८ गावे दि. ९ ते १५ मे दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेनमेंट झोन ) म्हणून घोषित केली आहेत. या कालावधीत दवाखाने व औषध दुकाने वगळता दूध, भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापार / व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.
संपूर्ण फलटण शहरव तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, तरडगाव, वाठार निंबाळकर, जाधववाडी या ८ गावातील प्रतिबंधीत क्षेत्रात सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणीही घराबाहेर न पडता घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
फलटण शहर व तालुक्यातील ८ गावातील प्रतिबंधीत क्षेत्रात किराणा, दूध, फळे भाजीपाला घर पोहोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी फलटण नगर परिषद यांनी विशेष अधिकारी यांची वॉर्ड निहाय नियुक्ती यापूर्वी केली आहे. त्याचप्रमाणे किराणा, दूध, फळे भाजीपाला या वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव यांनी दिली आहे.
रिपोर्टर