
विनामास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई सुरू,चार दिवसांत ३१ हजार २०० रुपये दंड वसूल.
- by Rameshwar Gawai
- Feb 24, 2021
- 2624 views
बदलापूर(प्रतिनिधी): कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने आता दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. नगर परिषद प्रशासनाने गेल्या चार दिवसांपासून ३१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मास्क, सॅनिटायजरचा वापर तसेच इतर नियमांचे पालन करण्याबाबत नगर परिषद प्रशासना कडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक विना मास्क फिरताना आढळून येत असल्याने नगर परिषद प्रशासनाने आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी नगर परिषद प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या ५१ जणांवर कारवाई करून प्रत्येकी ३०० याप्रमाणे १५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या चार दिवसांपासून ही कारवाई सुरू असून आतापर्यंत एकूण १०४ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३१ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभाग, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची वीस पथके तयार करण्यात आली असून ही पथके विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील
श्री.दीपक पुजारी (मुख्याधिकारी, कुबनप)
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम