प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत,कोरोना सल्लागार समितीची बैठक बोलवा.

बदलापूर (प्रतिनिधी) :  गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता बंद करण्यात आलेल्या उपाययोजना पुन्हा सुरू करणे गरजेचे असल्याने नगर परिषद प्रशासनाने तातडीने कोरोना सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करून याबाबत निर्णय घ्यावा,अशी मागणी माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली आहे.

कोरोना रुग्णांसाठी तसेच क्वारंटाईन नागरिकांसाठी आवश्यकतेनुसार सुविधा सुरू कराव्यात, कोरोना रुग्ण आढळलेल्या इमारतींमध्ये निर्जंतुकीकरण व स्वच्छतेबाबत इतर उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात यावेत, नियमांचे पालन न करणार्यावर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून बिट मार्शलची नियुक्ती करण्यात यावी, डासांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी सध्या बंद असलेली धूर फवारणी प्रत्येक विभागात तातडीने सुरू करावी, गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हँड वॉश व पाण्याची सुविधा असलेले स्टँड उभारण्यात यावेत, सार्वजनिक कार्यक्रम व समारंभात कोरोना विषयक नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांच्या सहकार्याने स्वयंसेवकांची पथके तयार करण्यात यावीत, व नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. उड्डाणपूलाखाली राहणाऱ्या बेघरांना नगर परिषदेच्या बेघर निवारा केंद्रात व्यवस्था करून या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात यावे, या ठिकाणी नाका कामगारांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गर्दीबाबतही उपाययोजना करावी, सार्वजनिक शौचालये व बायोटॉयलेट नियमित सफाई करण्याबाबत आदेश द्यावेत, प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या फेरीवाल्यांबाबत बैठकीत निर्णय घेण्यात यावा, शहरातील मुख्य चौकांचे निर्जंतुकी करण मोहीम राबविण्यात यावी, हॉटेल व हॉल व्यावसायिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करून गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात,आदी मागण्या मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितले

संबंधित पोस्ट