बदलापुरात फेरीवाल्यांना रस्त्यावर बसण्यास मनाई.
- by Rameshwar Gawai
- Feb 19, 2021
- 859 views
बदलापूर(प्रतिनिधी) कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाने खबरदारीचे उपाय घेण्यास स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषद प्रशासनाने फेरीवाल्यांना रस्त्यावर बसण्यास मनाई केली आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाने गुरुवार पासून हे प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे गुरुवारपासून पुढील आदेश येईपर्यंत रस्त्यावर कोणत्याही विक्रेत्यांना विक्री करता येणार नाही. यामध्ये भाजी,फळ, विक्रेत्यांसह खाद्यपदार्थांच्या हातगाडी विक्रेत्यांनाही नगर परिषद प्रशासनाने रस्त्यावर बसण्यास मनाई केली आहे. कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता खबरदारी घेण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यात रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर बंदी घातली आहे. नगर पालिकेच्या अतिक्रमण विभागा मार्फत बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसरात रस्त्यावर फेरीवाल्यांवर कारवाई देखील करण्यात येत होती. मात्र त्यात सातत्य नव्हते.आतापर्यंत बदलापूरात कोरोनाचे ९६१३ रुग्ण आढळले असून त्यातील ९३६९ रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांहून अधिक आहे. १२५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर ११९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम