बदलापूरात पाणी टंचाई असल्याने नागरिक उतरले रस्त्यावर .

बदलापूर (प्रतिनिधी)  : बदलापूर पूर्वेला सर्वाधिक झपाट्याने विस्तारित होत असलेल्या आपटेवाडी शिरगांंव परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. या सर्व नागरिकांना माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी

शिरगांव आपटेवाडी कृती समिती च्या माध्यमातून एकत्र करून पाणी परिषदेचे आयोजन केले होते. या पाणी परिषदेनंतर स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी शिरगांंव आपटेवाडी नाका येथे रस्ता रोको करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराचा तीव्र निषेध केला.

गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चे नेले.आंदोलनं केली, निवेदने दिली मात्र तरीही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या येथील नागरिकांनी अविनाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिरगाव आपटेवाडी नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. यापुढील काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जर येथील पाण्याची समस्या सोडवली  नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा अविनाश मोरे यांनी दिला आहे.सर्वसामान्य नागरिकांना व जुन्या रहिवाशांना, इमारतींना पाणी न देता नव्याने बांधकाम करणाऱ्या विकासकांना ज्यादा पैसे घेऊन पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन देत असल्याचा आरोप यावेळी मोरे यांनी केला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आणलेल्या अंशदान योजनेमुळे सर्वसामान्य इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना एक ते पाच लाख रुपये भरणे शक्‍य नसल्याने ते रद्द करून कमीत कमी पैसे घेऊन नवीन कनेक्शन द्यावेत अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच शिरगांंव परिसरात एक जादा पाण्याची टाकी बांधून देण्याची मागणीही शिरगांव आपटेवाडी कृती समितीच्यावतीने करण्यात आली.

संबंधित पोस्ट