आर पी आय नेते नरेश गायकवाडच्या हत्याकांडातील कुप्रसिद्ध गुंडांचा शिवसेनेत प्रवेश.

अंबरनाथ(प्रतिनिधी) :  अंबरनाथ मधील आर पी आय  नेते नरेश गायकवाड यांच्या हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची सजा भोगून आलेल्या कुप्रसिद्ध गुंडांनी काल शिवसेनेत प्रवेश केला आहे . कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे . 

८ नोव्हेंबर २००२ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चिंचपाडा,अंबरनाथ (प)  येथील कार्यालयात आर पी आय   (आठवले गट) शहर अध्यक्ष नरेश गायकवाड हे बसले होते, दरवर्षीप्रमाणे ते "आगळीवेगळी भाऊबीज " कार्यक्रमाची आखणी करीत होते, या कार्यक्रम अंतर्गत ते शहरातील गोर - गरीब महिलांना साडी आणि दिवाळीची मिठाई वाटपाचा कार्यक्रम करीत असत, यावेळी दबा धरून बसलेल्या इंदिन शेख , पापा शेख, मुत्तु शेख, फिरोज पठाण, अन्वर पठाण व अन्य गुंडांनी तीक्ष्ण हत्यारांनी नरेश गायकवाड यांच्यावर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नरेश गायकवाड यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . 

नरेश गायकवाड हत्याकांड प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते, आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी आर पी आय नेते आणि नरेश गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने आणि निदर्शने झाली . शेवटी पोलिसांनी आरोपी इंदिन शेख , पापा शेख, मुत्तु शेख ,फिरोज पठाण, अन्वर पठाण यांना अटक केली . या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली, न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची सजा ठोठावली होती . ही सजा भोगून सहा महिन्यांपूर्वी वरील गुंडांची मुक्तता झाली आहे . सजा भोगत असतांना मुत्तु शेख याची प्रकृती ढासळली आणि त्याचा मृत्यू झाला .  तर पॅरोलवर सुटलेल्या अन्य एका आरोपीचा अपघातात मृत्यू झाला होता. 

काल इंदिन शेख , पापा शेख ,फिरोज पठाण, अन्वर पठाण या कुप्रसिद्ध गुंडांनी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेऊनच हा प्रवेश झाला असल्याची चर्चा शहरात होत आहे तर गुन्हेगारांनी जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे, आता ते सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत तर त्यांना संधी मिळायला हवी अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे . 

या संदर्भात कल्याण जिल्हा शिवसेना प्रमुख गोपाळ लांडगे यांना विचारले असता ते म्हणाले की ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर सांगतो .

संबंधित पोस्ट