मुंबई-गोवा महामार्गाला वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- गणेश नाईक

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली गणेश नाईकांची भेट

नवी मुंबई : (प्रतिनिधी)मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे आश्‍वासन भाजप नेते माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांनी दिले. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवार, दि.9 फेब्रुवारी रोजी दुपारी नाईक यांची त्यांच्या नवी मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आगरी समाजाचे नेते जयेंद्रदादा खुणे हे देखील उपस्थित होते. 

मुंबई-गोवा महामार्गाला ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके राष्ट्रीय महामार्ग’ असे नाव द्यावे तसेच पळस्पे फाटा येथे वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाने चौक बनवून तिथे फडके यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीने केली आहे. याबाबातचे पत्र देखील त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. 

या मागणीबाबत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीचे उपाध्यक्ष रोशन पवार, सचिव संग्राम भोपी  यांच्या शिष्टमंडळाने गणेश नाईक यांची भेट घेत निवेदन दिले. तसेच या विषयावर नाईक यांच्याशी चर्चा केली. आगरी समाजाचे नेते जयेंद्रदादा खुणे नाईक यांनी देखील या मागणीला पाठिंबा देत सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. समितीच्या वतीने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची मूर्ती नाईक यांना भेट देत त्यांना सन्मानित केले. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा इतिहास प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांचे नाव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला देणे उचित ठरेल, असे सांगून ही मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे आश्‍वासन गणेश नाईक यांनी यावेळी दिले. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून फडके यांचे जन्मगाव शिरढोण ग्रामस्थ करत आहेत. याबाबतचा पाठपुरावा  येत्या काळात राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडे करण्यात येईल.

योगेश मुकादम अध्यक्ष -आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समिती

संबंधित पोस्ट