तिजोरी उघडेना म्हणुन चोरट्यांनी पळवूनच नेली,पोलिसांनी काही तासांतच केली दोघांची धरपकड मुद्देमालही हस्तगत.
- by Rameshwar Gawai
- Feb 10, 2021
- 837 views
बदलापुर(प्रतिनिधी) : कुरियर कंपनीमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना डिजिटल तिजोरी उघडता आली नाही. त्यामुळे चोरट्यांनी २ लाख ४५ हजार रुपये ठेवलेली ही तिजोरीच चोरून नेल्याची घटना बदलापुरात घडली होती. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच या चोरट्यांपैकी दोघांची धरपकड केली आहे,तर त्यांच्या फरार असलेल्या तीन साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
बदलापूर पश्चिम भागात बेलवली येथील फातिमा शाळेजवळ कृष्णा हेवन या बिल्डिंगमध्ये डिलिव्हरी प्रायव्हेट लिमीटेड कुरीयर कंपनी असुन कंपनीचे गोडाऊन आणि कार्यालय तेथेच आहे.या कुरीयर कंपनी मार्फत आँनलाईन खरेदी केलेल्या मालाचे वितरण होऊन,जमा झालेली रक्कम कुरीयर कंपनीच्या कार्यालयातील तिजोरीत जमा होत असे. गुरुवारी या कार्यालयातील गोदरेज कंपनीची लोखंडी मॅट्रिक्स तिजोरी व सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड होणारा डिव्हीआर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. त्यामुळे बदलापूरात एकच खळबळ उडाली होती.मात्र पोलिसांनी गुन्ह्याचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला. त्याअंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.सागर ढिकले,पो.हवा सुरंजे पादीर पो.ना.जयेश गुरव,पो.शि.गणेश भारती, विपुल पाटील,नितिन पादीर व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी चोरट्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील व आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त बातमीदारा मार्फत चोरट्यांची माहिती मिळवत अवघ्या ४ तासात ५ आरोपी निष्पन्न केले.आणि चोरट्यांनी चोरलेल्या तिजोरीची विल्हेवाट लावण्याआधीच चोरट्यांपैकी अजय सुर्यवंशी (२८) व राज उर्फ विशाल मालाकार (२०) या दोघांची धरपकड केली. अजय हा या कार्यालयात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. त्यानेच त्याच्या इतर साथीदारांना कार्यालयातील तिजोरी व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत माहिती देऊन चोरीचे पूर्ण प्लॅनिंग केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
जिला उर्फ जीलाजित दुबे व इतर दोघांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. जिला हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरट्यांनी सीसीटीव्हीचे डिव्हीआर मशीन चोरून नेल्याने चोरट्यां बाबत काहीही धागेदोरे पोलिसांच्या हाती नव्हते. मात्र तरीही शिताफीने तपास करून अवघ्या काही तासातच गुन्ह्याचा छडा लावून मुख्य सुत्रधारासह दोघांना गजाआड केल्याने बदलापूर पश्चिम पोलिसांचे कौतुक होत आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम