तर राष्ट्रवादीची स्वबळावर लढण्याचीही तयारी .

बदलापूर(प्रतिनिधी) :  कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी असा प्रयत्न राहणार आहे. मात्र आघाडी न झाल्यास राष्ट्रवादीची ही निवडणूक स्वबळावर लढण्याचीही तयारी असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी दिले आहेत. 

रविवारी बदलापूर पूर्वेकडील मानकिवली परिसरात राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ व वैशाली धुमाळ यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे दशरथ तिवरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी पालिका निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असून अनेक निवडणुका आघाडीच्या माध्यमातून यशस्वी झाल्या आहेत.त्यामुळे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी व्हावी,अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र त्यानंतरही स्थानिक पातळीवर याबाबत एकमत होत नसल्यास राष्ट्रवादी सक्षमपणे ही निवडणूक लढण्याच्या तयारीत असून कार्यकर्त्याना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे तिवरे यांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावरही बदलापूरात राष्ट्रवादीत दिसत असलेल्या गटबाजीबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. अशा कार्यकर्त्याची वा पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन त्यांना शेवटचे समजावून सांगण्यात येईल. त्यानंतरही कुणी वेडेवाकडे वागणार असेल तर त्याचे परिणाम काय होतील हे समजून घ्या. असा इशारा दशरथ तिवरे यांनी दिला. पक्षापेक्षा कुणी मोठा नाही,त्यामुळे नेता बनण्यापेक्षा आधी कार्यकर्ते बना असा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. बदलापुरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात महिला तसेच तरुणांचे राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याबद्दल ठाणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष विद्या वेखंडे यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, जितेंद्र पाटील, संजय कराळे, हेमंत यशवंतराव, सुभाष सूर्यराव, लक्ष्मण फुलवरे, पप्पू भोईर, उत्तम पालांडे, अनिसा खान, विद्या बैसाणे, ज्योती वैद्य आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट