कोरोना काळात पोलिसांचे योगदान महत्वाचे होते,पोलिस आयुक्त विवेक फणसळकर .

अंबरनाथ(प्रतिनिधी): कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी टाळेबंदी तीव्र करण्याची फार मोठी जबाबदारी पोलिसांवर आली होती. आपल्या कुटुंबाची, आपल्या आरोग्याची इतकेच नव्हे तर आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. त्यात हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बाधित झाले. त्यांची कुटुंबे  ही बाधित झाली. ३४ जणांना आपले जीव गमवावे लागले तरीही पोलीस कुठेही कमी पडले नाहीत,अशा शब्दांत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कोरोनाकाळात योगदान देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.. 

चोण मित्र मंडळ आणि सिंधुदुर्ग नागरी सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने सुमती गणपत पाटील यांच्या 'पोलिसांची माई' या आत्मचरित्राचे प्रकाशन शनिवारी रोटरी सभागृहात ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना विवेक फणसळकर यांनी वरील प्रतिपादन केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सी ए हेमंत गोगटे यांनी सूत्रसंचालन केले  तर गणपत पाटील यांनी स्वागत करुन सुमती पाटील यांनी प्रास्तविक केले आणि शेवटी  वासुदेव धुरी यांनी आभार प्रदर्शन केले. पोलिसां प्रती समाज असंवेदनशील होत आहे. अशा वेळी तीस चाळीस तास चौका चौकात सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी उभा  राहाण्याची जाणीव सुमती पाटील यांच्या सारख्याना होते आणि त्या अतिशय प्रेमाने, निरपेक्ष भावनेने, आपुलकीने पोलिसांच्या मदतीसाठी धावून येत असतात. पोलिसांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात. हे कार्य करतांना त्यांच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो, की  गर्व आणि दर्प नसतो हे महत्वाचे आहे. अशा व्यक्ती समाजाने घडवाव्यात असे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस केले.कोणताही बडेजाव अथवा स्वार्थ न पहाता सुमती पाटील यांनी पोलीस आणि यंत्रणेला तन, मन, धनाने मदत केली.  आपुलकी, प्रेमाची, मायेची थाप आमच्या सर्वांच्या पाठीवर घातली म्हणूनच आज त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठी आवर्जून आलो असल्याचे विवेक फणसळकर यांनी सांगितले. लेखक प्रशांत असलेकर, चित्रकार अनिल डावरे आणि मुद्रक गिरीश सोमणी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे, संजय धुमाळ, सुनील जाधव, लक्ष्मण सारीपुत्र, पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज धुमाळ, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार संभाजी शेलार, पतपेढीचे उपाध्यक्ष अप्पा धुरी, प्रमोद नाटेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

    'बाप तो बापच असतो'

 "बाप तो खरा बापच असतो "याचा मला प्रत्यय आला आहे. मी कोरोनमुळे आजारी होतो. सेवा बजावत असताना कधी बाधा झाली हे कळलेच नाही. मात्र अशा वेळी स्वतःसह कुटुंब बाधित असूनही स्वतः पोलीस आयुक्त फणसळकर साहेब माझ्या सारख्या सेवा बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आस्थेने विचारपूस करीत होते. म्हणूनच आम्हाला मानसिक बळ मिळाले. अशी विचारपूस केवळ बापच करू शकतो, आणि आम्हाला असा बाप लाभल्याने आम्ही स्वतःला फार भाग्यवान समजतो. अशा शब्दांत पोलीस हवालदार अजय धांडे यांनी या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. सुमतीताई या खऱ्या माई आहेत त्यांनीसुद्धा आम्हा सर्वाना प्रेम दिले. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची विचारपूस न करता आमच्या सारख्याना भर चौकात त्या आमची विचारपूस करून आम्हाला चहा, नाश्ता, जेवण देत असत. इतकेच नव्हे तर औषधे सुद्धा देत असल्याचे अजय धांडे यांनी सांगितले. आज आपले वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना आपण बोलण्याचे धाडस करीत आहोत त्याबाबत आधीच माफी मागतोय असे म्हणत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अजय धांडे यांच्या उत्स्फूर्त भाषणाची दखल घेत त्यांचा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

संबंधित पोस्ट