वांगणीसाठी हवे स्वतंत्र पोलीस स्टेशन....

बदलापूर (प्रतिनिधी):   बदलापूर जवळील वांगणी परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या परिसरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे वांगणी परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची  मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. अलीकडेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे पुन्हा एकदा ही मागणी करण्यात आली आहे. 

बदलापूर जवळ असलेल्या वांगणी परिसरात गेल्या काही वर्षांपासून लोकसंख्या झपाट्याने वाढली आहेत.ग्रामीण चेहरा असलेले वांगणी आता शहराच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. अवकाश दर्शन,नर्सरी व पावसाळी पर्यटनासाठी वांगणी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या निमित्ताने मोठ्या संख्येने पर्यटक,विद्यार्थी तसेच  व्यापारीही वांगणीत येत असतात. त्याचबरोबर आता वांगणी परिसरात अनेक इमारती उभ्या राहू लागल्या असून अनेक नागरिक इथे राहण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे चोरी व इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भविष्यातही वांगणी परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढण्याची चिन्हे आहेत. असे असताना वांगणी परिसरासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन बदलापूर येथे आहे. वांगणी बदलापूर दरम्यानचे अंतर सुमारे  ११ किमी आहे. त्यामुळे एखादी तक्रार वा गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री-अपरात्री पोलीस स्टेशनला जाणे सर्वसामान्य नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे.या पार्श्वभूमीवर वांगणी परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. 

कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वांगणीसह जवळच्या  डोणे, डोणेवाडी, ढवळे पाडा , कूडसावरे, गोरेगाव,कासगाव तर उल्हास नदी पलीकडील शीळ, इंदगाव, कान्होर ,काराव, धारोळा, लव्हाळी ,बोराडपाडा,भुईसावरे, जांभळे, देवळोली व बारवी डॅम पर्यंतच्या भागाचा समावेश आहे.

ग्रामपंचायतीने केला ठराव 

वांगणी ग्रामपंचायतीने नोव्हेंबर २०२० मध्ये वांगणीत पोलीस स्टेशनची इमारत उभारण्यासंदर्भात ठराव मंजूर केला आहे. वांगणी गावाचा वाढता विकास व वाढती लोकसंख्या तसेच वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता वांगणीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन गरजेचे आहे. स्वतंत्र पोलीस स्टेशन असल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल असे नमूद करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनची इमारत उभारण्यासाठी पेट्रोल पंपाजवळची जागा द्यावी, असेही या ठरावात  नमूद करण्यात आले आहे. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. 

पालकमंत्र्यांना साकडे 

शिवसेनेचे ठाणे उपजिल्हा प्रमुख एकनाथ शेलार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना अलीकडेच सादर केलेल्या निवेदनाद्वारे वांगणीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन किंवा सब पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी केली आहे. पोलीस स्टेशनची इमारत उभारण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध असल्याचेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी वांगणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांनीही पालकमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे वांगणीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी केली होती.

संबंधित पोस्ट