ग्रामपंचायत सदस्यासह चौघांवर प्राणघातक हल्ला.

बदलापूर(प्रतिनिधी):   बदलापूरजवळील ढोके-दापीवली येथे भाजपाचा पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यासह चौघावर दहा-पंधरा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या चौघांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती कुळगाव पोलिसांनी दिली.

बुधवारी संध्याकाळी ५.३० वा च्या सुमारास ढोके-दापीवली येथील नदीजवळ हा हल्ला करण्यात आला. भाजयुमोचे तालुकाध्यक्ष हेमंत भोईर, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर भोपी आणी दोघे जण शिर्डीहून घरी परतत असताना ढोके त्यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी धारदार शस्त्राने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला  या हल्ल्यात हेमंत भोईर , श्रीधर भोपी , समाधान भोपी आणि अमोल भोईर हे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बदलापूरच्या भगवती रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. राजकीय वादातून हा प्रकार झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात कुळगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या कामावरून हा वाद झाला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  त्यांची नावे जाहीर करण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला.

संबंधित पोस्ट