महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निर्भय योजना सुरू पुन्हा करावी-राष्ट्रवादीची मागणी.

बदलापूर(प्रतिनिधी) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी बिलांची थकबाकी कोट्यवधीच्या घरात पोहचली आहे. ही थकबाकी वसूल व्हावी व नागरिकांनाही दिलासा मिळावा  या साठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची निर्भय योजना पुन्हा सुरू करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमणे यांनी केली आहे.

निर्भय योजनेंतर्गत थकीत पाणी बिलावरील व्याज माफ होत असल्याने ज्या नागरिकांची बिले थकीत आहेत,त्यांना ही थकीत बिले भरणे सुलभ होते. आतापर्यंत या योजनेमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बिल वसुलीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र जुलै २०१५ पासून निर्भय योजना बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना थकीत बिले भरणे शक्य झालेले नाही. त्यातूनच अंबरनाथ शहरात  ८९ कोटी तर बदलापूर शहरात ४८ कोटी पाणी बिलांची थकबाकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना थकीत बिलावरील व्याजमाफी व बिल भरण्यास सवलत मिळावी यासाठी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला लवकरात लवकर थकीत बिले वसूल करणे शक्य व्हावे यासाठी निर्भय योजना लागू करावी,अशी आपली मागणी असल्याचे हेमंत रुमणे यांनी सांगितले. यासंदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे .

संबंधित पोस्ट