'तो' अपघात गंट्री ऑपरेटरच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका
- by Rameshwar Gawai
- Jan 31, 2021
- 444 views
बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापूर-अंबरनाथ रेल्वे स्थानकां दरम्यान एटीआरटी मशीन घसरून झालेल्या अपघातास गंट्री ऑपरेटरचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. सुनील कुमार उर्फ सोनू सिंग असे या गंट्री ऑपरेटरचे नाव असून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान २७ जानेवारीला पहाटे ३. १५ वा च्या सुमारास एटीआरटी मशीनच्या मदतीने रेल्वे ट्रॅकवरील सिमेंटच्या स्लीपर्स बदलण्याचे काम सुरु होते. सोमनाथ कन्स्ट्रक्शन प्रा.लि. कंपनीचे कामगार हे काम करीत होते.यावेळी एटीआरटी मशीन इंजिनवर आधळून झालेल्या अपघातात गणेश सिद (२०), वासुदेव सिद (२६) हे कामगार जखमी झाले. तर गंभीररित्या जखमी झालेल्या राजू झुगरे (३६) या कामगाराचा मृत्यू झाला.
सुरुवातीला याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासात यासाठी एटीआरटी मशीनवरील गंट्री ऑपरेटरचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, सुनीलकुमार याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी दिली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम