राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी,प्रदेश सचिवानी दिले संकेत .
- by Rameshwar Gawai
- Jan 29, 2021
- 927 views
बदलापूर (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी व शिवसेनेत स्थानिक पातळीवर होत असलेली राजकीय स्पर्धा पाहता कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी होणार का? याविषयी अनेक तर्क वितर्क व्यक्त होत आहेत. असे असतानाच राष्ट्रवादी स्वबळ आजमावण्याची शक्यता असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी दिले आहेत.
बदलापूर शहरातील २० तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्या सानेवाडी भागातील जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी या युवकांचे राष्ट्रवादीत स्वागत करून देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बदलापूरात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. ही ताकद आणखी वाढवून युवाशक्तीच्या बळावर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच्या सर्व ४७ जागा लढवाव्या लागतील, असे कालिदास देशमुख म्हणाले. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी तरुणांनी जोमाने सक्रिय व्हावे,असे आवाहनही त्यांनी केले. ह्या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, जिल्हा सेवा दल कार्याध्यक्ष हेमंत यशवंतराव, महिला शहर अध्यक्षा अनिसा खान, कामगार सेलचे शहराध्यक्ष सूर्यराव, ज्योती वैद्य, ज्योती बैसणे आदी उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आशिष दामले निवडून आलेल्या प्रभागात जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी यापुढे या प्रभागातून शिवसेनेचा नगरसेवक निवडून येईल,असा दावा केला होता. त्यावर आशिष दामले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय सध्या बदलापूरात शिवसेनेने जनसंपर्क कार्यालयांच्या उदघाटनांचा धडाका सुरू ठेवला आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम