बदलापूरात निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत धुसफूस .

बदलापूर(प्रतिनिधी):  कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच महाविकास आघाडीबाबतही वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. असे असतानाच शिवसेना व राष्ट्रवादीत सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे बदलापूरात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याची चर्चा बदलापूरातील राजकीय वर्तुळात होत आहे. 

कुळगाव बदलापूर नगर परिषदेची  सुमारे ८ महिन्यांपासून लांबणीवर पडलेली सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. जनसंपर्क कार्यालये, विकासकामांची भूमिपूजन यांचा धडाका सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी बेलवली भागात शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत हा प्रभाग शिवसेनेकडे नव्हता.परंतु आता या प्रभागातून राष्ट्रवादीचा नव्हे तर शिवसेनेचा नगरसेवक निवडुन येईल, असा दावा यावेळी वामन म्हात्रे यांनी केला. या प्रभागात अपेक्षित विकास झाला नसल्याची टीकाही त्यांनी केली होती. ज्या प्रभागात हा कार्यक्रम झाला;त्या प्रभागातून मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आशिष दामले निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून जनतेला अपेक्षित असलेली कामे होत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर आम्हीही महाविकास आघाडीचे भान ठेवून काम करीत असतो. मात्र शिवसेनेच्या शहर-प्रमुखांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या प्रभागात येऊन  राष्ट्रवादी विषयी चुकीचा मेसेज देणे दुर्दैवी असल्याची भावना आशिष दामले यांनी व्यक्त केली आहे. तर आधी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रभागांमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली पण त्यावेळी आम्ही काही प्रतिक्रिया दिली का?असा सवाल शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी उपस्थित केला. सर्व प्रभागात शिवसेनेचे उमेदवार तयार आहेत. आणि पालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता यावी यासाठी शहरप्रमुख या नात्याने माझे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी करण्याबाबत आदेश दिल्यास त्या आदेशाचे पालन करू,असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी पॅनिक होऊ नये. 

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आशिष दामले यांनी शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या अनेक प्रभागात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानंतर आम्ही सुरुवात केली आहे. त्यामुळे आता त्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही. पक्षाच्या नेत्यांचा आदेश आल्यास आघाडी करू. परंतु तोपर्यंत शहरप्रमुख या नात्याने पालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणे माझे काम आहे, आणि ते मी करीत आहे.

: श्री.वामन म्हात्रे 

शिवसेना शहरप्रमुख, बदलापूर

शिवसेना शहरप्रमुखांचे वक्तव्य दुर्दैवी. 

शिवसेना शहर प्रमुखांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या प्रभागात येऊन यापुढे इथे राष्ट्रवादी निवडून येणार नाही, शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येईल, असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे,दुर्दैवी आहे. निवडणुकीपूर्वी आघाडी करणार नाही नंतर काय ते पाहू,असे शिवसेना म्हणत असेल तर ते चालणार नाही. निवडणुकीपूर्वी आघाडी न झाल्यास नंतरचा योग्य तो निर्णयही राष्ट्रवादी घेईल. 

: श्री.आशिष दामले

शहराध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बदलापूर

संबंधित पोस्ट