पर्यावरण राज्यमंत्र्यानी त्या दिले कंपन्यांच्या चौकशीचे आदेश

बदलापूर(प्रतिनिधी) :  अंबरनाथ व उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या विषारी रसायनांमुळे  नदीकाठच्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला. हा  प्रकार घडल्या नंतर  पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे हे बदलापुरात आले होते . तेव्हा त्याना हा प्रकार कळल्यावर त्यानी  याप्रकरणी दोषी असलेल्यां कंपन्यांची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई  करण्याचा इशारा दिला आहे.

अंबरनाथच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आणि आनंद नगर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतून प्रवास करून येणाऱ्या वालधुनी नदीची गेल्या काही वर्षात प्रदुषणामुळे प्रचंड वाताहत झाली आहे. औद्योगिक वसाहत ते उल्हासनगर या  विविध ठिकाणी विविध प्रकारचे, रंगाचे सांडपाणी या नदीत मिसळते. त्यामुळे दररोज या वालधुनीचा रंग बदलतो. शनिवारी मध्यरात्री किंवा रविवारी पहाटेच्या सुमारास काटई कर्जत राज्यमार्गावरील कमलधाम वृद्धाश्रमाच्या मार्गाजवळ पुलाखाली वालधुनी नदीच्या पात्रात टँकरद्वारे रसायने नदीत सोडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण दिवस नदीकाठच्या आणि अंबरनाथमधील बहुतांश भागात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना नाक दाबून घराबाहेर पडावे लागत होते. याप्रकरणी सोमवारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत अंबरनाथ शहरातील औद्योगिक वसाहतींमध्ये पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी बदलापुरातील साहित्य गौरव ग्रंथालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही या प्रकारावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. वालधुनी नदी प्रदुषणाचा मुद्दा गंभीर असून मंगळवारी याबाबत मंत्रालयात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि विभागाच्या सचिवांसोबत बैठक पार पडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या नोटीसा आणि त्यावरील कारवाईबाबत राज्यमंत्र्यांना विचारले असता, कोणत्याही दोषी कंपन्यांना सोडले जाणार नाही. योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट