अंबरनाथमध्ये ज्वेलर्सवर दरोडा,तीन जण जखमी .

अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून २५ तोळे सोने घेऊन चार दरोडेखोर फरार झाल्याची घटना घडली आहे. यावेळी झालेल्या झटापटीत दुकान मालकासह तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

अंबरनाथ पश्चिमेकडील सर्वोदय नगर भागात असलेल्या भवानी ज्वेलर्स या दुकानात रविवारी  एकच्या सुमारास मोटरसायकल वरून आलेल्या चार दरोडेखोरांनी दरोडा घातला. दुकानात भैरव सिंग (२२) नावाचा एकच कर्मचारी असल्याचे पाहताच  दरोडेखोरांनी पिस्तूल  व चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली. त्याचवेळी दुकानात आलेल्या दुकानाचा मालक वसंत सिंग (२६) याने दरोडेखोरांना विरोध केला. या झटापटीत भेदरलेल्या दरोडेखोरांनी दुकान मालक आणि कर्मचाऱ्यावर पिस्तूलमधून   गोळीबार सुरू केला. त्याचवेळी दुकानात आलेल्या लक्ष्मण सिंग यांनीही दरोडेखोरांना विरोध केला. यावेळी एका दरोडेखोराने चाकूने हल्ला केला. दुकानात आणि दुकानाबाहेर झालेल्या झटापटीत वसंत सिंग, भैरव सिंग आणि लक्ष्मण सिंग जखमी झाले आहेत. यावेळी सहा गोळ्या झाडल्या गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या झटापटीनंतर दरोडेखोरांनी पळ काढला. यावेळी दरोडेखोरांनी सुमारे २५ तोळे सोने लंपास केली असल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे. हल्ल्यातील जखमी तिघेही सुरक्षित असून त्यांच्यावर मध्यवर्ती  रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तैनात करण्यात आली असून विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आल्याची माहितीही  मोहिते यांनी दिली आहे. गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाचा समातंर तपास केला जातो आहे. या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, न्यायवैद्यक विभाग, स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

संबंधित पोस्ट