अंबरनाथमधील वनविभागाच्या नोंदींचा प्रश्न निकाली मोहनपूरम, शिवगंगा नगरच्या जागेवर होती वनविभागाची नोंद.

अंबरनाथ(प्रतिनिधी)अंबरनाथच्या कानसई परिसरात निवासी जागांवर वनविभागाच्या नोंदी टाकल्या त्यामुळे  रहिवाशी  हवालदिल झाले होते.अखेर अनेक वर्षांच्या पाठ-पुराव्यानंतर या नोंदी हटणार असून या जागा आता सोसायट्यांच्या नावावर होणार आहेत. या संदर्भातील स्पष्ट आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगर, मोहनपुरम या भागाला या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. या परिसरात १९८० च्याही आधीपासून नागरी वस्ती असून मध्यंतरीच्या काळात अचानकपणे मानवी वस्ती असलेल्या भागावर हरित पट्ट्याचं आरक्षण टाकत या जागेवर वनविभागाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे या भागात राहणारे १५ ते २० हजार नागरिक हवालदिल झाले होते. जागाच नावावर नसल्यानं खरेदी-विक्रीचं रजिस्ट्रेशन होऊ शकत नव्हतं. शिवाय डीम कन्व्हेयन्स होऊ शकत नसल्यानं जुन्या इमारतींचा पुनर्विकासही होऊ शकत नव्हता. त्यामुळे रहिवाशांची अडचण दिवसेंदिवस वाढत चालली होती. शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर हे यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होते. तर यंदा मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही या प्रश्नावर आवाज उठवत शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या जागांवरील वनविभागाच्या नोंदी हटविण्याचे आदेश दिले आहेत. उल्हासनगरचे प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी नुकतेच  या आदेशाची प्रत आमदार बालाजी किणीकर आणि स्थानिकांना दिली. दरम्यान मनसेनं मात्र यामागे आमदार राजू पाटील यांचा पाठपुरावा असल्याचे म्हटल आहे. अंबरनाथ मधील मोहन पुरम स्वामी प्रकाश गार्डन या ही इमारती वीस वर्षापूर्वीच बनवण्यात आल्या होत्या मात्र वन विभागाची नोंद झाल्याने या ठिकाणच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर त्याचा थेट परिणाम झाला होता लाखो रुपये टाकून देखील आपले फ्लॅट नियमानुसार विकता येत नसल्याने या भागातील नागरिक त्रस्त होते याप्रकरणी शासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी सातत्याने केली जात होती.

संबंधित पोस्ट