अंबरनाथ तालुक्यात ३७७ उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात.

बदलापूर(प्रतिनिधी)अंबरनाथ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर आता तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. २७ ग्रामपंचायतीसाठी आता ३७७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून १७३ जागांसाठी त्यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंबरनाथ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतसाठी ७३९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले  होते. त्यापैकी ६ अर्ज अवैध ठरल्याने ७३३ उमेदवार रिंगणात होते. त्यातील ९ सदस्य संख्या असलेली गोरेगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून इतर ग्रामपंचायत मधील ६९ सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. त्याशिवाय उमेदवारी अर्ज केलेल्या ७३९ उमेदवारांपैकी २७५ उमेदवारांनी सोमवार ४ जानेवारीला  उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या  १७३ जागांसाठी ३७७ उमेदवारांमध्ये निवडणुकीची  चुरस  पहावयाला मिळणार आहे. गोरेगाव  ग्रामपंचायतची  बिनविरोध निवड झाली आहे. याठिकाणी ९ सदस्य निवडणूक रिंगणात होते अशी माहिती मुख्य निवडणूक  निर्णय अधिकारी आणि तहसिलदार जयराज देशमुख यांनी दिली आहे.

                प्रशासन सज्ज 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी ७९ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह १० सहाय्यक अधिकारी  १० अधिकारी तसेच सुमारे ५०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

      १५ जानेवारीला निवडणूक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदार संख्या ४७ हजार १२ असून पुरुष मतदार २४ हजार ४४९ तर महिला मतदार २२हजार ५६३ आहेत. १८ जानेवारीला अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयात मतमोजणी होणार आहे.

संबंधित पोस्ट