अंबरनाथचा कचरा बदलापूरात नको,आमदार किसन कथोरे यांनी दिला आंदोलनाचा इशारा.

बदलापूर(प्रतिनिधी)  : अंबरनाथ नगर परिषदेने अंबरनाथ शहरातील कचरा बदलापुरात टाकण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करून अंबरनाथमधील कचरा बदलापुरात टाकण्यास आपला ठाम विरोध असेल अशी भूमिका आमदार किसन कथोरे यांनी घेतली आहे. बदलापुरातील लोकप्रतिनिधी  सर्वसामान्य नागरिकांचाही याला विरोध असल्याने हा प्रस्ताव नामंजूर न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे. 

अंबरनाथ नगर परिषदेने अंबरनाथमधील कचरा बदलापुरातील डंपिंग ग्राउंडवर टाकण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रात निघणारा घनकचरा विल्हेवाट लावण्याकरिता परवानगी मिळणेबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेत बुधवारी  दोन्ही नगर परिषदांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीत  दैनंदिन घनकचरा विल्हे-वाट लावण्याकरिता दोन्ही नगर पालिकांचा संयुक्त घनकचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला आहे. या कामाचा प्रकल्प अहवाल सल्लागारामार्फत तयार करून तांत्रिक मूल्यमापन आयआयटी मुंबई यांचेकडून करण्यात आले असून शासनाकडे मंजुरी करिता सादर झालेला आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या डंपिंग ग्राउंडजवळ दिवाणी न्यायालय इमारत झाल्याने तेथे न्यायालय सुरु होणार असल्याने नगर परिषदेच्या वापरातील डम्पिंग ग्राउंडवर कचरा विल्हेवाट लावणे बंद करण्याबाबत निर्देश आहेत. दोन्ही नगर पालिकांचा संयुक्त घनकचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला असल्याने नव्याने जागा शोधून अल्प कालावधीसाठी प्रकल्प उभारणे सोयीचे नाही. त्यामुळे संयुक्त प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वापरात असलेल्या डंपिंग ग्राउंड वर अंबरनाथ नगर परिषद हद्दीत निघणारा घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी परवानगी मिळणेबाबत चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे बैठकीच्या पत्रात मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी नमूद केले होते. बदलापुरातील काही माजी नगरसेवकांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली. असे असले तरी आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे. आमदार किसन कथोरे यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना दिलेल्या पत्राद्वारे अंबरनाथचा कचरा बदलापुरात नको अशी भूमिका घेत या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला आहे. दुसऱ्या शहराच्या हद्दीत आपला कचरा  टाकणे चुकीचे व अन्यायकारक आहे. त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेने त्यांच्या हद्दीत इतर जागा शोधून त्याठिकाणी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, असा सल्ला आमदारांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी अंबरनाथचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

कुळगाव बदलापूर विकास समितीनेही दर्शवला विरोध.  

कुळगाव बदलापूर विकास समितीनेही अंबरनाथ शहरातील कचरा कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीतील डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यास विरोध दर्शविला आहे. त्याशिवाय शहरातील इतर काही सामाजिक संघटना व राजकीय पक्षही या प्रस्तावाला विरोध दर्शविण्याचा तयारीत असल्याचे 

बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या मुद्द्यावरून बदलापूरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित पोस्ट