बाबासाहेबांचे स्मारक बदलापूरची नवी ओळख ठरणार -आ .किसन कथोरे.

बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापूरातील सोनिवली येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी दिली. बाबासाहेबांचे स्मारक बदलापूरची ओळख ठरावी,अशा पद्धतीने स्मारकाची उभारणी व्हावी, असा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. या कामाची नुकतेच आमदार किसन कथोरे यांनी पाहणी केली. यावेळी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी व सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांनी स्मारकाच्या कामाबद्दल चर्चा केली. बदलापूर ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही बदलापूरची ओळख ठरेल.बदलापूरच नव्हे तर इतर ठिकाणचे लोकही आवर्जून स्मारकाला भेट देतील अशा पद्धतीने स्मारकाची उभारणी करण्याचा आपला मानस असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले. स्मारकाची उभारणी करण्याबरोबरच स्मारकासमोरील जागेत भव्य असे उद्यान उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मारकासाठी एवढी मोठी जागा मिळवणे, त्यासाठीचे आरक्षण बदलणे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे या सगळ्या प्रक्रियेत विलंब लागला. अनेक अडचणी आल्या या सर्वांवर मात करून स्मारकाचे काम वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल,असा विश्वास कथोरे यांनी व्यक्त केला.

बुद्ध मूर्तीच्या कामाचीही केली पाहणी.  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील स्तुपात उभारण्यात येणारी भगवान गौतम बुध्दांची पंचधातुची मूर्ती मूर्तीकार सिद्धाराम गायकवाड साकारत आहेत. . या कामाचीही आमदार कथोरे यांनी पाहणी केली. यावेळी सुधाकर जाधव,  धनराज गायकवाड, राकेश गरुड, संजय गायकवाड, सुखदेव गायकवाड, जगदीश सोनवणे, उमेश गायकवाड,भगवान गोडांबे, सिद्धार्थ जाधव,डॉ. सचिन पाटोळे, आप्पा वाघमारे, सुरेश तायडे,गणेश गायकवाड, सदाशिव झोडगे, उत्तम केदारे, सुनील जाधव, विक्रम पवार, अविनाश सोनवणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता संतोष घोडके, शाखा अभियंता पतंगराव आदी उपस्थित होते. 

            असे असेल स्मारक

आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून सोनिवली येथे उभारण्यात येत असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक दोन मजली असेल. त्यामध्ये असलेल्या स्तुपात भगवान गौतम बुध्दांची पंचधातुची मूर्ती असेल.भिक्खू निवास, पर्यटक निवास, भव्य ग्रंथालय, विपश्यना केंद्र, संस्कार केंद्र, ग्रंथालयाच्या जवळ बाबासाहेबांचा भव्य पुर्णाकृती पुतळा व अशोकस्तंभ आणि फाउंटन (कारंज्या) असेल. त्याचप्रमाणे गार्डन मॅरेज हॉलही असणार आहे. 

ऑगस्ट २००९ मध्ये स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन होऊन मार्च २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली . स्मारकाच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून डॉ.आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ७ कोटी ९३ लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला असून वैशिष्ट्यपूर्ण आमदार निधीतून १ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. स्मारकच्या उर्वरित कामासाठी आमदार किसन कथोरे यांनी शासनाकडे आणखी १ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सचिव सुधाकर जाधव यांनी दिली.

संबंधित पोस्ट