अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीचे ८ सदस्य बिनविरोध.

बदलापूर (प्रतिनिधी):  ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असतानाच गोरेगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. गावात एकोपा रहावा या भावनेतून गावकऱ्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला असून इतर अनेक ग्रामपंचायतीमध्येही अशाप्रकारे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव या ग्रामपंचायतीत ९ सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार होते. मात्र गावात एकोपा रहावा यासाठी गावकऱ्यांनी सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समिया अमजद बुबेरे, निदा अक्रम बुबेरे, शकीरा तकी बुबेरे, मिझाब बुबेरे, रणजित सोनकांबळे, मनिषा हिंदोळे, विठ्ठल वाघ, संतोष वाघ या ८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून आता याबाबत औपचारिक घोषणा होणेच बाकी राहीले आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी यासीर सलीम बुबेरे, यासीर खालिद बुबेरे, नय्यर अनिस बुबेरे, मोअझम गुलजार बुबेरे , शफीक बालमिया बुबेरे, दानिश खालिद बुबेरे, शाहिद बुबेरे, मुमावर बुबेरे, सामी बुबेरे आदींनी पुढाकार घेतला होता. त्याला सर्व ग्रामस्थांनीही साथ दिल्याचे मुस्लिम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यासीर बुबेरे यांनी सांगितले. निवडणुकीच्या राजकारणातून अनेकदा एकमेकांच्या मनात कटुता निर्माण होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी  व गावात एकोपा टिकवून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी  गोरेगावातील नागरिकांनी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.


 २७ ग्रामपंचायतीसाठी ७३७ उमेदवार 

अंबरनाथ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या २४७ जागांसाठी ७४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत ६ अर्ज अवैध ठरल्याने ७३७ अर्ज वैध झालेआहेत. १५ जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. असे असले तरी बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यासाठी सध्या ग्रामीण भागात बैठकांचे सत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ४ जानेवारी या उमेदवारीअर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत अनेक ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित पोस्ट